04 December 2020

News Flash

बंगळुरूची दमदार भरारी

धावांचे लक्ष्य गाठताना राजस्थान रॉयल्सचे फलंदाज ढेपाळतात, याचाच प्रत्यय पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर पुन्हा पाहावयास मिळाला.

| May 21, 2015 06:23 am

धावांचे लक्ष्य गाठताना राजस्थान रॉयल्सचे फलंदाज ढेपाळतात, याचाच प्रत्यय पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर पुन्हा पाहावयास मिळाला. त्यामुळेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने राजस्थानवर ७१ धावांनी मात करीत आयपीएल स्पर्धेच्या ‘क्वॉलिफायर-२’ लढतीत स्थान मिळवले आहे. आता शुक्रवारी रांची येथे बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्या लढतीमधील विजेता संघ रविवारी मुंबई इंडियन्सशी अंतिम फेरीत लढणार आहे.
अब्राहम डी’व्हिलियर्स व मनदीप सिंग यांनी केलेल्या धडाकेबाज अर्धशतके तसेच त्यांची ११३ धावांची भागीदारी यामुळेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला राजस्थान रॉयल्स संघापुढे विजयासाठी १८१ धावांचे आव्हान ठेवता आले होते. शेवटच्या पाच षटकांमध्ये राजस्थानच्या गोलंदाजांनी बंगळुरुला ६७ धावा दिल्या. या धावाच राजस्थानसाठी महागात पडल्या. त्यांचे पहिले पाच अनुभवी फलंदाज ८७ धावांत तंबूत परतले. तेथेच त्यांचा पराभव स्पष्ट झाला. अजिंक्य रहाणे (३९ चेंडूंत ४२) याने झुंजार खेळ केला. त्याच्या सहकाऱ्यांनी सपशेल निराशा केली. त्यामुळेच त्यांचा डाव १९ षटकांत १०९ धावांमध्ये आटोपला. राजस्थानकडून एकही फलंदाज अपेक्षेइतकी आक्रमक फलंदाजी करू शकला नाही. त्यामुळेच प्रेक्षकांची निराशा झाली.
बंगळुरू संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. ख्रिस गेल व कर्णधार विराट कोहली यांनी डावाची सुरुवात केली. गेलने चार चौकारांबरोबरच एक षटकार ठोकून झकास प्रारंभ केला. मात्र धवल कुलकर्णीने त्याचा २७ धावांवर त्रिफळा उडवत त्याच्या चाहत्यांची निराशा केली. पुढच्या षटकात स्वत:च्या गोलंदाजीवर धवलने कोहलीला बाद केले. पहिल्या १० षटकांत त्यांना २ बाद ६० धावांवर रोखण्यात राजस्थानने यश मिळविले होते.
मुंबईविरुद्ध नाबाद शतक टोलविणाऱ्या एबी डीव्हिलियर्सने १५ व्या षटकांत अंकित शर्माला दोन षटकार व चौकार ठोकला. या षटकात बंगळुरूला १९ धावा मिळाल्या. ए बीला मनदीप सिंगने चांगली साथ दिली. डी’व्हिलियर्सने ख्रिस मॉरिसला षटकार ठोकून ३४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. तसेच या षटकाराबरोबरच त्याने भागीदारीचे शतकही ६१ चेंडूंत पार केले. ही भागीदारी पूर्ण झाल्यानंतर तो धावबाद झाला. त्याने ३८ चेंडूंत ६६ धावा करताना चार चौकार व चार षटकार अशी आतषबाजी केली. मनदीपने ३३ चेडूंत नाबाद ५४ धावा केल्या. त्यामध्ये त्याने सात चौकार व दोन षटकार अशी फटकेबाजी केली.

संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : २० षटकांत ४ बाद १८० (एबी डी’व्हिलियर्स ६६, मनदीप सिंग ४४, धवल कुलकर्णी २/२८) विजयी विरुद्ध राजस्थान रॉयल्स : १९ षटकांत सर्वबाद १०९ (अजिंक्य रहाणे ४२, हर्षल पटेल २/१५, युझवेंद्र चहल २/२०)
सामनावीर : ए बी डी’व्हिलियर्स

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2015 6:23 am

Web Title: ipl 8 ab mandeep stand rcb deliver
टॅग Ipl,Ipl 8
Next Stories
1 पंचांच्या निर्णयावर नाराजी प्रकट केल्याने धोनीला दंड
2 कोहलीला स्पष्टीकरण देण्याची नोटीस
3 ‘कोहलीसाठी कठोर प्रशिक्षकाची गरज’
Just Now!
X