‘चाहत्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवा, जो पाठिंबा दिला त्यामुळेच आम्ही हे जेतेपद पटकावू शकलो,’’ असे म्हणत मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल विजेतेपद मुंबईकरांना समर्पित केले. आयपीएलच्या अंतिम फेरीत मुंबईने चेन्नई सुपर किंग्जवर मात करत दुसऱ्यांदा जेतेपदाला गवसणी घातली होती. या विजयानंतर सोमवारी मुंबई इंडियन्स संघाकडून एका खास स्वागत सोहळ्याचे आयोजन वानखेडे स्टेडियमवर केले होते. यावेळी आपल्या घरच्या प्रेक्षकांनाही या आनंदात मुंबईच्या संघाने सामावून घेण्याचा प्रयत्न केला.

जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये संघ मालकीण नीता अंबानी यांच्यासह मुंबईचा संघ मैदानात दाखल झाला आणि चाहत्यांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर संपूर्ण संघाने स्टेडियमला विजयी फेरी मारत चाहत्यांचे अभिवादन स्वीकारले. हा कार्यक्रम पूर्वनियोजित नसल्यामुळे क्रिकेट सामन्यांएवढी या सोहळ्याला गर्दी नव्हती. पण प्रत्येक स्टँडमधून उत्साहात संघाचे स्वागत केले जात होते.
स्वागत फेरी संपल्यावर मैदानाच्या मध्यभागी एक छोटेखानी मंच बनवण्यात आला होता. त्या मंचावर खेळाडूंना एकामागून एक बोलावण्यात आले. खेळाडूंशी संवाद साधण्यात आला आणि मुंबई इंडियन्सच्या हातामध्ये चषक दिल्यावर ‘फटाके’बाजी आणि रोषणाईसह चाहत्यांच्या जल्लोषाने वानखेडे स्टेडियम दणाणून गेले

सचिनचाच नारा बुलंद
भारताचा मास्टर-ब्लास्टर माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याची जादू अजूनही ओसरली नसल्याचेच मुबंई इंडियन्सच्या या विजयी सोहळ्यात जाणवले. यावेळी प्रेक्षकांनी मुंबई इंडियन्सपेक्षा ‘सचिन.. सचिन..’ हाच नारा बुलंद केल्याचे पाहायला मिळाले. प्रत्येक ठिकाणी सचिनच्याच नावाचा नाद निनादत होता. सचिननेही आपल्या चाहत्यांना नाराज केले नाही.

सचिनची मराठमोळी साद
या स्वागत सोहळ्यात सचिने प्रेक्षकांना मराठीमध्येच साद घातली. ‘‘नमस्कार मुंबई, तुमच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते. तुम्ही प्रत्येकवेळी पाठिशी उभे राहिलात. आनंदाचे असे क्षण आयुष्यात फार कमी येतात आणि तुमच्यासोबत हे सारे साजरे करताना आनंद द्विगुणित होतो,’’ असे सचिन म्हणाला.

मला सर्वात जास्त जर काही आवडत असेल तर ती मुंबई आहे. कारण इथूनच मी कारकिर्दीची सुरुवात केली. प्रत्येक वेळी प्रेक्षकांचा पाठिंबा मला मिळत गेला. प्रत्येक सामन्यागणिक तुमचा पाठिंबा वाढत गेला आणि तुम्ही अखेपर्यंत आमच्यावर विश्वास ठेवलात. हा चषक मुंबईला समर्पित करतो.
रोहित शर्मा, मुंबई इंडियन्सचा कर्णधार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईच्या या विजयाने पुन्हा एकदा स्वप्नपूर्तीचा आनंद मिळाला. स्पर्धेचे दडपण तर होतेच, पण आम्ही फार चांगला खेळ केला. २० हजार शाळकरी मुलांना मी ‘एज्युकेशन फॉर ऑल’ या उपक्रमांतर्गत मुंबई इंडियन्सचा सामना दाखवू शकले, याचाही मला आनंद आहे. तुम्ही जगभरात कुठेही गेलात तरी मुंबईसारखे दुसरे ठिकाण असू शकत नाही.
नीता अंबानी, मुंबई इंडियन्सच्या मालकीण