अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात पंजाबने चेन्नईचा ४ धावांनी पराभव केला. ख्रिस गेलच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर पंजाबने दिलेल्या १९८ धावांच्या आव्हानाला महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नईने चांगलीच टक्कर दिली, पण अवघ्या ४ धावांनी त्यांचा पराभव झाला. १९८ धावंच्या लक्ष्याचा पाठलाग करताना निर्धारीत २० षटकात चेन्नईच्या संघाने ५ गडीबाद १९३ धावा केल्या, यंदाच्या आयपीएलमधील हा चेन्नईचा पहिला पराभव ठरला.
चेन्नईकडून धोनीने ४४ चेंडूंमध्ये ७९ धावा केल्या, पण संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. या विजयाच्या जोरावर पंजाबने गुणतालिकेत चेन्नईला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे, तर चेन्नईची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यापूर्वी चेन्नईने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्यांदाच खेळणा-या ख्रिस गेलकडे सर्वांच्या नजरा होत्या, आणि आपल्या पहिल्याच चेंडूवर चौकार लगावत गेलनेही दणक्यात सुरुवात केली. ख्रिस गेलने आज महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या गोलंदाजांची मनसोक्त धुलाई केली. केवळ २२ चेडूंमध्ये गेलने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. चौफेर फटकेबाजी करत अवघ्या ३३ चेंडूंमध्ये गेलने ६३ धावांची धडाकेबाज खेळी केली. अखेर शेन वॉट्सनने गेलला इम्रान ताहीरकरवी झेलबाद केले. ख्रिस गेलच्या अर्धशतकाशिवाय लोकेश राहुल (37) आणि मयंक अग्रवाल (30) यांनी उपयुक्त खेळी केली. त्यांच्या खेळीमुळे किंग्स इलेवन पंजाबने चेन्नई सुपर किंग्सविरोधात सात विकेट गमावून १९७ धावा बनवल्या.
दुसरीकडे, पंजाबच्या 198 धावांचा पाठलाग करताना चेन्नईची चांगली सुरुवात खराब झाली. त्यांनी दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पण त्यानंतर अंबाती रायडूने चेन्नईचा किल्ला लढवला. 49 धावांवर तो धावचीत झाला. रायडू बाद झाल्यावर धोनीने सामन्याची सारी सूत्रे हातात घेतली. अखेरच्या षटकापर्यंत धोनीने अखेरपर्यंत किल्ला लढवला, धोनीने 44 चेंडूंत सहा चौकार आणि पाच षटाकारांच्या जोरावर नाबाद 79 धावांची खेळी साकारली. पण अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकूनही धोनी चेन्नईला विजय मिळवून देऊ शकला नाही. धोनीने 44 चेंडूंत सहा चौकार आणि पाच षटाकारांच्या जोरावर नाबाद 79 धावांची खेळी साकारली.
संक्षिप्त धावफलक
किंग्ज इलेव्हन पंजाब : ७ बाद १९७ (ख्रिस गेल ६३, लोकेश राहुल ३७, मयांक अगरवाल ३०, करुण नायर २९; शार्दूल ठाकूर २/३३) वि. चेन्नई सुपर किंग्ज : ५ बाद १९३ (महेंद्रसिंग धोनी नाबाद ७९, अंबाती रायडू ४९).