आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जला पुन्हा एकदा पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. अबु धाबीच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नईवर १० धावांनी मात केली. मोक्याच्या क्षणी KKR च्या गोलंदाजांनी केलेलं पुनरागमन आणि अखेरच्या षटकांत सुनिल नारायण व वरुण चक्रवर्तीचा खुबीने वापर करत कोलकाताने सामन्याचं चित्र बदलून टाकलं. चेन्नईकडून शेन वॉटसनने ५० धावांची खेळी केली, मात्र मोक्याच्या क्षणी मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेली निराशाजनक कामगिरी चेन्नईला चांगलीच महागात पडली. चेन्नईचा संघ १५७ धावांपर्यंतच मजल मारु शकला.

धोनी आणि सॅम करन जोडी माघारी परतल्यानंतर केदार जाधव आणि रविंद्र जाडेजा जोडी मैदानात आली. यावेळी चेन्नई सुपरकिंग्जला विजयासाठी २१ चेंडूत ३९ धावा हव्या होत्या. खरं पहायला गेलं तर चेन्नईसारख्या संघासाठी हे आव्हान काही कठीण नव्हतं. परंतू केदार जाधवने मैदानावर सेट होण्यासाठी बरेच चेंडू वाया घालवले, स्ट्राईक रोटेट न झाल्यामुळे CSK वर दबाव वाढला ज्याचा फटका संघाला बसला. या पराभवानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी केदार जाधवला संघातून वगळण्याची मागणी केली आहे. परंतू तेराव्या हंगामात चेन्नईच्या संघाची परिस्थिती पाहता, केदार जाधवला वगळल्यास कोणत्या खेळाडूला संधी द्यायची हा प्रश्न चेन्नईसमोर आहे.

केदार जाधवच्या जागेवर CSK कोणत्या खेळाडूंचा संघात विचार करु शकते हे पाहूयात…

१) मुरली विजय – आयपीएलच्या तेराव्या हंगामात सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये CSK ने मुरली विजयला सलामीच्या जागेवर संधी दिली होती. परंतू या संधीचं सोनं करण्यात तो अपयशी ठरला. ३ सामन्यांत त्याच्या नावावर फक्त ३२ धावा जमा आहेत. परंतू रैनाची अनुपस्थितीत मधल्या फळीतल्या फलंदाजांची खराब कामगिरी आणि कमी अनुभव या गोष्टी लक्षात घेता CSK चं संघ व्यवस्थापन पुन्हा एकदा मुरली विजयला संधी देण्याचा विचार करु शकतं.

२) ऋतुराज गायकवाड – अंबाती रायुडू दुखापतग्रस्त असताना महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडला CSK ने संघात स्थान दिलं. रैनाच्या अनुपस्थितीत ऋतुराज तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येईल असा अंदाज बांधला जात होता. परंतू मिळालेल्या संधीचं सोनं करण्यात तो देखील अपयशी ठरला. परंतू संघाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता CSK चं व्यवस्थापन ऋतुराजला सलामीला फलंदाजीसाठी पाठवत आणखी एक प्रयोग करण्याचा प्रयत्न करु शकतं. स्थानिक टी-२० क्रिकेटमध्ये ऋतुराजची चांगली कामगिरी त्याला संघात आणखी एक संधी देण्यासाठी पुरेशी आहे.

३) नारायण जगदीशन – २०१८ साली CSK ने नारायण जगदीशन या यष्टीरक्षक फलंदाजाला संघात स्थान दिलं होतं. परंतू हा खेळाडू अद्याप आपला पहिला सामना खेळण्याच्या प्रतिक्षेत आहे. सुरेश रैनाची अनुपस्थिती, केदार जाधवचं फॉर्मात नसणं अशा परिस्थितीत नव्या खेळाडूला संधी देण्याचा विचार झाल्यास जगदीशन हा CSK समोर उत्तम पर्याय ठरु शकतो.