आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. सलामीच्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर मात करत चेन्नईने धडाकेबाज सुरुवात केली. परंतू यानंतर राजस्थान आणि दिल्लीविरोधात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. प्रमुख खेळाडूंना झालेली दुखापत, रैना-हरभजनची माघार या सर्व गोष्टींमुळे चेन्नईचा संघ संकटात सापडला आहे. त्यात शेवटच्या दोन सामन्यांमध्ये धोनी फलंदाजीसाठी उशीरा येत असल्यामुळे सोशल मीडियावर चाहते नाराज आहेत. अनेकांनी रैनाला पुन्हा संघात जागा द्यावी अशी मागणी केली होती.

खासगी कारण देऊन स्पर्धेतून माघार घेतलेल्या रैनाच्या पुनरागमनाबद्दल केल्या काही दिवसांपासून अनेक चर्चा सुरु होत्या. परंतू आता त्याचं संघातलं पुनरागमन अशक्य मानलं जातंय. कारण CSK ने आपल्या संकेतस्थळावरुन रैनाचा फोटो हटवला आहे.

काही दिवसांपूर्वी रैना दुबईत मिळालेल्या हॉटेलच्या रुमवरुन नाराज असल्याचं समोर आलं होतं. परंतू भारतात आपल्या परिवारातील सदस्यावर झालेल्या हल्ल्यामुळे आपल्याला परतावं लागल्याचं रैनाने स्पष्ट केलं होतं. CSK चे सीईओ काशी विश्वनाथन यांनीही काही दिवसांपूर्वी, खासगी कारण देऊन रैनाने माघार घेतलेली असल्यामुळे त्याच्या पुनरागमनाबद्दल ठोस माहिती देता येणार नाही अशी माहिती दिली होती. त्यातच CSK ने रैनाचा फोटो हटवल्यामुळे आता त्याचं पुनरागमन कठीण मानलं जातंय.