गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी माऱ्याच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामात राजस्थान रॉयल्सवर मात केली आहे. दुबईच्या मैदानात रंगलेला सामना १३ धावांनी जिंकत दिल्लीने पुन्हा एकदा गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली. १६२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ १४८ धावांपर्यंतच मजल मारु शकला. दिल्लीकडून तुषार देशपांडे आणि अजिंक्य रहाणे या दोन मराठमोळ्या शिलेदारांनी अखेरच्या षटकांत प्रभावी कामगिरी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

अखेरच्या षटकात राजस्थानला विजयासाठी २२ धावांची गरज होती. मैदानावर राहुल तेवतिया असल्यामुळे दिल्लीच्या गोटात चिंतेचं वातावरण होतं. तेवतियाने याआधी राजस्थानला अशाच पद्धतीने दोन सामने जिंकवून दिले असल्यामुळे तुषार देशपांडे कशी कामगिरी करतो याकडे सर्वांच्या नजरा होत्या. पहिल्याच चेंडूवर तेवतियाने षटकार मारण्याचा प्रयत्न केला. परंतू सीमारेषेवर उभ्या असलेल्या अजिंक्य रहाणेने प्रसंगावधान राखत चेंडू आत ढकलत संघासाठी ५ महत्वाच्या धावा वाचवल्या. अजिंक्यच्या या कसरतीचा दिल्ली पुढे फायदाच झाला. पाहा हा व्हिडीओ…

यानंतर तुषार देशपांडेनेही राजस्थानच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी न देता प्रभावी मारा केला. अखेरच्या चेंडूवर श्रेयस गोपाळची विकेट घेत तुषारने दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.