आयपीएलचा तेरावा हंगाम महेंद्रसिंह धोनी आणि चेन्नई सुपरकिंग्ज संघासाठी फारसा चांगला गेला नाही. एरवी नेहमी अंतिम फेरीच्या शर्यतीत असणारा हा संघ यंदा साखळी फेरीतूनच बाहेर पडला. गुणतालिकेत हा संघ सध्या तळातल्या स्थानावर आहे. सुरेश रैना-हरभजनची स्पर्धा सुरु होण्याआधीच माघार, युएईत दाखल झाल्यानंतर खेळाडूंना झालेली करोनाची लागण, दुखापती, खेळाडूंचं फॉर्मात नसणं आणि चुकीची संघ निवड अशा अनेक मुद्द्यांनी यंदा CSK ला ग्रासलं होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या धोनीची धडाकेबाज फलंदाजी आयपीएलमध्ये पहायला मिळेल अशी चाहत्यांना आशा होती. परंतू इथेही त्यांच्या पदरी निराशाच पडली. चेन्नईचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर सोशल मीडियावरही चाहते धोनीवर नाराज होते. अशा परिस्थितीत भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार अंजुम चोप्रा धोनीच्या मदतीसाठी धावून आली आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : प्ले-ऑफची शर्यत होतेय रंगतदार, तुमचा आवडता संघ आहे का या शर्यतीत? जाणून घ्या…

“मला वाटतं की पुढची काही वर्ष धोनी चेन्नईकडून खेळेल, आणि त्याने का खेळू नये?? माझ्यामते तो एकमेव खेळाडू असावा की जो कधीही लिलावाच्या यादीत उतरलेला नाही. तो चेन्नईसाठी महत्वाचा खेळाडू आहे त्यामुळे धोनीने संघाकडून खेळत राहणं गरजेचं आहे. एका हंगामात त्याची आणि संघाची कामगिरी खराब झाली याचा अर्थ असा होत नाही की धोनी वाईट कर्णधार आहे. धोनी अनुभवी खेळाडू आहे, अनेकदा त्याने संघाला कठीण सामने जिंकवून दिलेत. आपल्या संघासमोर काय आव्हानं आहेत आणि त्यावर मात करण्यासाठी काय करायला हवं हे त्याला माहिती आहे. जर ही गोष्ट त्याला माहितीच नसती तर आतापर्यंत त्याने संघाला इतकी विजेतेपद मिळवून दिली नसती. एका हंगामात कामगिरी चांगली झालेली नसल्यामुळे फारसा फरक पडत नाही.” अंजुम चोप्रा इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होती.

परंतू यापुढे चेन्नईच्या संघाची बांधणी करण्याच्या दृष्टीकोनातून नेमके काय बदल करायला हवेत हे धोनीला पहावं लागेल आणि याची जाणीव त्यालाही झालीच असेल, असंही अंजुम चोप्रा म्हणाली. सलामीच्या सामन्यात चेन्नईने मुंबई इंडियन्सवर मात करत स्पर्धेची चांगली सुरुवात केली होती, परंतू यानंतर चेन्नईची गाडी रुळावरुन घसरतच गेली.

अवश्य वाचा – BLOG : चेन्नईसाठी खरं आव्हान तर पुढे आहे !