IPL 2020 RCB vs DC: बंगळुरू विरूद्धच्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकली. फलंदाजांची कसोटी पाहणाऱ्या या खेळपट्टीवर दिल्लीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यात जो संघ जिंकेल तो थेट ‘प्ले-ऑफ्स’मध्ये प्रवेश करेल हे नक्की आहे. त्यामुळे दोन्ही संघांनी आपल्या प्लेइंग ११मध्ये महत्त्वाचे बदल केले. दिल्लीच्या संघाने अजिंक्य रहाणे, अक्षर पटेल आणि डॅनियल सॅम्स या तिघांना संघात स्थान दिलं आहे. तर बंगळुरूच्या संघातून गुरूकीरत आणि नवदीप सैनीला वगळून शिवम दुबे आणि शाहबाज अहमदला संधी देण्यात आली आहे.

असं आहे Playoffs चं गणित…

आजच्या सामन्याचा विजेता संघ १६ गुणांसह थेट ‘प्ले-ऑफ्स’मध्ये जाईल. जर दिल्लीचा संघ १८ पेक्षा जास्त धावांनी पराभूत झाला किंवा बंगळुरूचा संघ २२ पेक्षा जास्त धावांनी पराभूत झाला, तर कोलकाताचं ‘प्ले-ऑफ्स’चं तिकीट पक्कं होईल. पण जर आजचा सामना रंगतदार झाला आणि विजयाचं अंतर नमूद केलेल्या धावांपेक्षा कमी असेल, तर दिल्ली आणि बंगळुरू दोघेही प्ले-ऑफ्ससाठी पात्र ठरतील. अशा परिस्थितीत कोलकाताला हैदराबाद-मुंबई सामन्याची वाट पाहावी लागेल. त्या सामन्यात हैदराबाद पराभूत झालं, तरच कोलकाताला ‘प्ले-ऑफ्स’मध्ये प्रवेश मिळेल.