पंजाबविरूद्धच्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थानच्या संघात जोस बटलरचे पुनरागमन झाले. डेव्हिड मिलरच्या जागी त्याला स्थान देण्यात आले. तर सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या जागी अंकित राजपूतला संघात स्थान देण्यात आले. पण राजस्थानचा पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय पूर्णपणे फसला. बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात तडाखेबाज शतक करणारा लोकेश राहुल राजस्थानविरूद्धच्या सामन्यातदेखील त्याच लयीत दिसला. दुसरीकडे पहिल्या सामन्यात अर्धशतक ठोकणारा मयंक अग्रवालदेखील तुफान फटकेबाजी करताना दिसला.

पंजाबच्या फलंदाजांच्या तुफान फटकेबाजीत एक गोष्ट राजस्थानच्या चेहऱ्यावर हसू आणणारी ठरली. रियान पराग या नव्या दमाच्या खेळाडूने अत्यंत अप्रतिम असं क्षेत्ररक्षण केलं. श्रेयस गोपाल सातव्या षटकात मयंक अग्रवालला गोलंदाजी करत होता. त्यावेळी मयंकने चेंडू हवेत मारला. चेंडू सीमारेषेच्या जवळ असतानाच रियान परागने चपळाईने उडी मारली आहे चेंडू आतल्या बाजूला ढकलला आणि अप्रतिम फिल्डिंगचा नजराणा पेश केला.

दरम्यान, सुरूवातीपासूनच राहुल आणि मयंक अग्रवालने तुफान फटकेबाजी केली. राजस्थानचा सर्वोत्तम गोलंदाज जोफ्रा आर्चर यालाही राहुलने सोडलं नाही. आर्चर आपलं पहिलं षटक टाकण्यासाठी आला तेव्हा पंजाबच्या २८ धावा झाल्या होत्या. आर्चरने गोलंदाजी सुरू केल्यावर राहुलने त्याच्या गोलंदाजीचा यथेच्छ समाचार घेतला. आर्चरने टाकलेले पहिले तीनेही चेंडू सीमारेषेबाहेर पाठवत त्याने चौकारांची हॅटट्रिक केली.