मी सायकल शिकायला लागलो आणि माझी आई दुचाकी शिकायला लागली तो काळ एकच होता. आम्हाला दोघांना आपापली वाहने शिकायला मोकळी आणि प्रशस्त माळराने मिळाली. आम्ही दोघेही दुसऱ्याच्या वाहनांवर सराव करायला शिकलो. मी माझ्या आत्येभावाच्या सायकलवर आणि ती माझ्या बाबांच्या मित्राच्या एका दुचाकीवर. त्या काळात माझी माझ्या शहराशी पहिल्यांदा खाजगी अशी ओळख झाली. तोपर्यंत जी ओळख होत होती ती भूतकाळाच्या संदर्भाने होत होती. आमचे शहर काय आहे, मी कोण आहे, माझे कुटुंब आणि माझा समाज काय आहे, हे मला फक्त भूतकाळ सांगत होता. मी सायकल शिकलो आणि आमच्या ओळखीला वर्तमानकाळ आला. भविष्यकाळसुद्धा आला. कारण मला तेव्हा वेगाने वारा कापत शहरातून जाताना हे लक्षात आले की माणसाप्रमाणे शहरे सतत बदलत असतात. शिवाय ती मरतात आणि पुन्हा नव्याने जन्म घेत असतात. नश्वरतेची आणि तात्पुरतेपणाची आध्यात्मिक अनुभूती शहरी माणसाला नवीन नसते. आज आहे ते उद्या असेलच असे नाही, या भावनेवर तुमचे रोजचे आयुष्य चालू असते. माझ्या प्राथमिक शाळेत माझ्या वर्गात असलेली दोन जुळी मुले एकदम मरून गेली तेव्हा मला अंगात सुई भोसकल्यासारखे झाले. पण काही क्षणात माझ्या त्वचेवरील भोक पुन्हा भरून आले आणि मी पूर्ववत झालो. माझे आवडते पुस्तकाचे दुकान फार लहानपणी बंद होऊन गेले. विद्यापीठाजवळ असलेले भलेमोठे उंच, जिवंत कारंजे बंद करून, बुजवून टाकून तिथे रस्ता झाला. घडय़ाळे आणि छत्र्या दुरूस्त करणारी किंवा रिकाम्या बाटलीत खोटा परफ्यूम भरून देणारी छोटी, लाकडी फळ्यांचे दरवाजे असलेली दुकाने एक-एक करून दिसेनाशी झाली. वस्तू दुरूस्त करण्याची सवय फार वेगाने शहरातून संपून गेली. ज्या वास्तुरचनेमुळे माझे शहर ओळखले जात होते त्या इमारती आणि राहती घरे काही वर्षांत ढासळून दिसेनाशी झाली. हे सगळे ज्या वेगाने घडले त्या वेगामुळे आमचा ‘हे सगळे बदलणे आपल्या हातात आहे’ किंवा ‘जुने काही टिकवायला आपणही काही प्रयत्न करू शकतो’ या गोष्टीवर कधीही विश्वास बसला नाही. दहा-बारा वर्षांत आजूबाजूचे जग होत्याचे नव्हते झाले. हे सगळे समोर घडताना मला शाश्वत आणि कायमची सुखाची आणि सुरक्षिततेची जाणीव देणारे साहित्य आणि संगीत आवडेनासे झाले. कारण सायकल शिकल्यावर माझे माझ्या शहराशी एखाद्या व्यक्तीसारखे नाते तयार झाले होते. मला अशाश्वत आणि क्षणभंगुर सोबत देणाऱ्या आनंदाचे महत्त्व कमी आहे असे वाटेनासे झाले. त्यात व्यसने आली, तात्पुरती नाती आली, अनोळखी व्यक्तींशी जवळचा संबंध आला. या सगळ्या गोष्टी- ज्यांना आपला समाज ‘अनैतिक’ म्हणतो त्या गोष्टी- एखाद्या ुूं३ी१्रं प्रमाणे आपल्या वाढीसाठी आवश्यक आहेत हे माझ्या लक्षात आले. फलाटावर ट्रेनची वाट पाहत उभ्या असलेल्या प्रवाशांशी होते तशी माझी माझ्या शहराशी मैत्री झाली. अजूनही मी आणि माझे शहर असे दोघे एकमेकांशी त्याच नात्यात आहोत. मात्र, स्वत:च्या शरीराशी तशी मैत्री होण्याला अजून थोडा वेळ लागतो आहे. माझे जे एकाच वेळी आपलेपणाचे आणि एकाच वेळी त्रयस्थपणाचे नाते माझ्या शहराशी आहे, तसेच नाते मला माझ्या शरीराशी तयार करायचे आहे. माझी ती धडपड चालू आहे. मला एकटय़ाने कोणत्या तरी थंड घरात संपून जाण्यात कसलीशी भीती वाटत आहे. ती भीती सावकाश निघून गेली की मग पुन्हा एकदा सायकल शिकल्यासारखे वाटणार आहे हे मला आता माहिती आहे.
आजपर्यंत आपला जितका वेळ गेला आहे तो सर्व वेळ आई कोणत्या तरी त्वेषाने पुन्हा मिळवत होती. त्यासाठी तिने दुचाकी शिकायला घेतली होती. ती हे करताना आत्ता मी आहे त्याच वयाची होती. त्यामुळे त्या काळातील तिचे वागणे मला आता शांतपणे आठवताना उमजते. मागे गेलेला वेळ त्वेषाने मिळवायची धडपड करणारे वय. माझे आत्ताचे वय. ती फार वेगाने दुचाकी चालवायला शिकली. मग ती पोहायला शिकायला गेली. आणि त्यानंतर तिने लहान मुलांचे उत्तम आणि शास्त्रशुद्ध संगोपन करायची एक जागा तिच्या वेगळ्याच जाणिवेने उभी केली. ती गाडी शिकताना आम्ही एखादे सर्कसमधील जनावर गाडी चालवत असताना पाहून टाळ्या वाजवून आनंदी व्हावे तसे तिला गाडी चालवताना, ती सहजपणे वळवताना पाहताना आनंदी होत असू. तिला लग्न करायचे नव्हते आणि मुले वाढवत बसणे तिचे स्वप्न नव्हते, हे ती मला एखादा लहान मित्र असल्यासारखे अनेक वेळा सांगत असे. मला ते कळते आहे किंवा कळत नाहीये, याची पर्वा न करता ती हे बोलायची. दुचाकी शिकणे हे तिच्यासाठी त्या मोकळेपणाचे आमंत्रण होते- ज्या मोकळेपणाची तिने लहानपणीपासून आस धरली होती. र्निबध नाही; पण मोकळे, सुटे. आणि ज्याला कोणतीही आखणी नसेल असे आयुष्य जगायची आतून प्रबळ इच्छा असलेली ती मुलगी असणार- जिला घरातील गरिबीमुळे विचारांचे फार पर्याय उपलब्ध नव्हते. तिने मला लग्नाविषयी आणि मुले जन्माला घालून आपला मोलाचा खाजगी वेळ वाया घालविण्याविषयी सावध केले. तिने मला सांगितले की, तुझ्या खाजगी, मोकळ्या आणि भीतीशिवाय जगण्याच्या मार्गात आपल्या कुटुंबात सुरू असलेला कोणताही पारंपरिक मार्ग मधे येऊ देऊ नकोस. तिच्या वडिलांनी तिच्या लिहायच्या वह्य विहिरीत फेकून देऊन तिला लिहायचे थांबवले होते. तिच्या मनातील आतले असे काही वाढत्या शहरात जमिनीखाली पुरल्या गेलेल्या विहिरीसारखे आत लुप्त झाले होते, ते तिने माझ्या लिखाणामार्फत खणून प्रवाही केले.
आईने दुचाकी शिकून जे एकटेपणाचे स्वातंत्र्य मिळवले ते तिने मला स्वयंपाक शिकवून बहाल केले. जुने नियम आणि जुन्या सवयी मोडून स्वावलंबी होण्याची सुरुवात आणि दुसऱ्या माणसावर वेगळ्या मार्गाने, गुप्तपणे आणि शांतपणे प्रेम करायचा मार्ग तिने मला स्वयंपाक करण्यातून दाखवून दिला. तिने मला गोष्टी संपण्याची, शिळ्या होण्याची, फेकून देण्याची, कष्टाने केलेली गोष्ट नासताना पाहण्याची सवय लावली. मी आजपर्यंत आयुष्यात रीतसर आणि रीतभात सोडून अशा दोन्ही मार्गानी जे काही शिकलो त्यात स्वयंपाकाने मला जगायला तयार केले असे मला आता शांतपणे लक्षात येते.
मला जगताना ज्या काही गोष्टींमुळे शांतता आणि संतुलन मिळते त्यामध्ये स्वयंपाक ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. जी मी फक्त आईकडून नाही, तर इतर अनेक व्यक्तींकडून सावकाश आणि नकळत शिकलो. रोजच्या लिखाणाचे आणि मी घरात स्वत:साठी आणि इतरांसाठी करीत असलेल्या स्वयंपाकाचे काहीतरी अबोल असे नाते आहे. वाचन, प्रवास, संगीत, दृश्यकला, चित्रपट या मला आवडणाऱ्या आणि मला आतून बळ देणाऱ्या माध्यमांमध्ये माझ्यासाठी स्वयंपाकसुद्धा येतो. किंवा मला असे वाटते, की तो माझ्यासाठी सगळ्याच्या आधी येतो. त्यानंतर कुणालाही न घाबरता आणि न संकोचता केलेले लिखाण येते. जर तसे लिहिणे जमले तर. कारण नेहमीच असे करणे जमत नाही.
मी माझ्या आईचे तिच्या वडिलांनी विहिरीत फेकून दिलेले लिखाणाचे कागद पाहू शकतो. माझ्या मनात त्याचा एक सिनेमा शांतपणे चालू असतो. अनेक वेळा अनेक माणसे आपल्याला ‘आपण काय लिहावे आणि काय नाही’ किंवा ‘कसे लिहावे’ असे सांगताना मला दिसले तर त्यावेळी मी मनातील तो सिनेमा चालू करतो.
मी कच्ची आणि बेसूर गाणी लिहून पाहणारा आजचा लेखक आहे. एखाद्या गोदामात रोज सराव करणाऱ्या े४२्रू ुंल्ल िचा गिटारिस्ट असल्यासारखा आहे. मी सुरात वाजवायची जबाबदारी कधीही घेतलेली नाही. मी माझ्या शहरासारखा आहे. माझा काळ, माझे जगणे आणि माझ्याभोवतीचे तंत्रज्ञान इतक्या वेगाने बदलते आहे, की मला दहा वर्षांच्या वर आपण लिहिलेले काही टिकेल याची अजिबात खात्री नाही. दहा दिवसांचीसुद्धा नाही. मला माझे भविष्य दिसत नाही. आजूबाजूच्या गोष्टी शांतपणे पाहत अपग्रेड होत राहणे हे माझे काम आहे.
kundalkar@gmail.com
(समाप्त)