बहुचर्चित अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला यंदा कमी प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेश नोंदणीच्या अंतिम दिवसापर्यंत १ लाख ८२ हजार ७७१   विद्यार्थ्यांनी आपले अर्ज कन्फर्म केले असल्याचे शिक्षण उपसंचालक विभागातर्फे जाहीर करण्यात आले आहे. यंदा दहावी मुंबई विभागातून पास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता हा आकडा फारच कमी असल्याचे दिसून येते. दरम्यान, अनेकांचे अपूर्ण राहिलेले अर्ज कन्फर्म करण्यासाठी मंगळवार दुपापर्यंत ३ वाजेपर्यंत मुदत देण्यात आल्याची माहिती शिक्षण उपसंचालक बी.डी. फडतरे यांनी दिली.
मुंबईतील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी यंदाही शिक्षण उपसंचालक विभागामार्फत एमकेसीएलच्या माध्यमातून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली आहे. सोमवारी या प्रक्रियेची अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती. मात्र या कालावधीत १ लाख ८२ हजार ७७१ अर्ज दाखल झाले आहेत. दहावीच्या निकालात यंदा मुंबई विभागातून ३ लाख ३ हजार ९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हा एकूण आकडा लक्षात घेता अनेकांची ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालीच नसल्याचे दिसून आले आहे, त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे ऑप्शन आणि प्रवेश अर्ज भरून तयार आहेत, त्या विद्यार्थ्यांनी उद्या ३ वाजेपर्यंत ‘कन्फर्म’ करावेत, असे आवाहन शिक्षण उपसंचालक बी.डी. फडतरे यांनी केले आहे.

अर्जाचा तपशील
विभाग                                          अर्ज दाखल
मुंबई दक्षिण                                        २४२०८
मुंबई, उत्तर                                          ३१७६२
मुंबई पश्चिम                                       ४७७४८
नवी मुंबई महानगरपालिका परिसर     १०४४५
मीरा भाईदर महानगरपालिका              ७९७९
भिवंडी महानगरपालिका                     ४९७०
पनवेल महानगरपालिका                     ५९६९
कल्याण डोंबिवली महानगरपालिका   १२४३५
वसई विरार महानगरपालिका            १४३९७