अर्जाचा भाग १ भरल्यानंतर या भागात काय काळजी घ्यायला हवी ते पाहू..
एसएससीच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत दहावीचा बैठक क्रमांक टाकल्यावर त्यांची माहिती सॉफ्टवेअरमधून आपोआप येणार आहे. मात्र, या माहितीत काही त्रुटी आढळल्यास विद्यार्थ्यांना ग्रिव्हन्सचे बटण दाबून चुका दुरुस्त करून घ्याव्या लागतील. नावात, जन्मतारखेत, जातीमध्ये चूक असू शकते. जर चूक नावामध्ये असेल तर त्याची दुरुस्ती केवळ अर्जामध्ये करून चालणार नाही. तर त्या चुकांची माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत बोर्डालाही कळविणे आवश्यक आहे. अन्यथा गुणपत्रिका व शाळा सोडल्याच्या दाखल्यात विसंगती राहील.
-अर्जाचा भाग १ भरून सबमिट करायचा आहे. जर विद्यार्थ्यांने कुठल्याही आरक्षणाचा लाभ घेतला असेल किंवा माहिती बदलासाठी ग्रिव्हन्स मागितले असेल तर अशा विद्यार्थ्यांच्या अर्जावर प्रलंबित असे दिसेल. शाळेत योग्य कागदपत्रे घेऊन जाऊन अर्ज अप्रूव्ह करून घ्यावा.
– प्रवेश अर्ज भाग – १ ऑनलाइन सादर केल्यानंतरही विद्यार्थ्यांला अर्जामध्ये काही दुरुस्ती करणे आवश्यक वाटले तर त्याबाबतचा योग्य तो पुरावा घेऊन मुख्याध्यापक/प्रवेश केंद्रावर मुदतीत करून घ्यावा लागतील. अर्ज पुन्हा सबमिट करावा लागेल.जर विद्यार्थ्यांचा पासवर्ड हरवला तर त्याला मुख्याध्यापकांकडे किंवा मार्गदर्शन केंद्रावर जाऊन अर्ज रिसेट करून घ्यावा लागेल. अर्ज रिसेट केल्यानंतर पुस्तकातील पासवर्डने अर्ज पुन्हा भरून सबमीट/अप्रूव्ह करून घ्यावा लागेल.आता आपण अर्जाचा भाग-१ कसा भरायचा याची माहिती संपवीत आहोत. पुढील भागात आपण भाग-२ कसा भरायचा ते पाहू.
(लेखक ऑनलाइन समितीचे सदस्य असून भवन्स महाविद्यालयाचे सहउपप्राचार्य आहेत.)