मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक डॉ. पद्मा देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या परीक्षा विभागाचा कारभार पुन्हा एकदा निर्नायकी झाला आहे. विद्यापीठाच्या अनेक महत्त्वाच्या परीक्षा तोंडावर आल्या असताना हे महत्त्वाचे पद रिक्त झाले आहे.
कुलगुरू, प्र-कुलगुरू यांच्या खालोखाल असलेल्या कुलसचिव या पदाच्या बरोबरीने विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक हे पद महत्त्वाचे मानले जाते, मात्र गेल्या साडेतीन वर्षांच्या काळात विद्यापीठात पाच परीक्षा नियंत्रक होऊन गेले, त्यापैकी डॉ. देशमुख यांचा कार्यकाळ सर्वात अल्प म्हणजे सात-आठ महिन्यांचा होता. या अत्यंत संवेदनशील पदावर अधिकारी एक-दीड वर्षांहून अधिक काळ टिकत नसल्याचेच यानिमित्ताने समोर आले आहे.
एका बाजूने नवी महाविद्यालये, वाढती विद्यार्थीसंख्या, विषय, त्यामुळे नवनवीन परीक्षांची पडणारी भर यामुळे परीक्षा विभागाचे काम वाढते आहे. त्या तुलनेत विभागाकडे असलेली मर्यादित अधिकारी व कर्मचारी संख्या अशा कात्रीत हा विभाग सापडला आहे. परीक्षेच्या कामात सहकार्य न करणाऱ्या किंवा न जुमानणाऱ्या महाविद्यालयांची डोकेदुखीही विभागाला सहन करावी लागते. परिणामी, परीक्षा विभागाचा कारभार हाकणे ही नियंत्रकांसाठी मोठी कसरत ठरते आहे. त्यातून एकाही अधिकाऱ्याला त्याचा कार्यकाळ पूर्ण करण्याची संधी मिळत नसल्याने या विभागाची विस्कटलेली घडी मार्गावर येणार तरी कशी, असा प्रश्न आहे.
परीक्षा नियंत्रकाचा कार्यकाळ पाच वर्षांचा आहे, पण जानेवारी, २०१२ मध्ये विलास शिंदे यांना या पदावरून दूर करण्यात आल्यानंतर या पदावर कुठलाही अधिकारी एक वर्षांहून अधिक काळ टिकला नाही. शिंदे यांच्यानंतर अतिरिक्त कुलसचिव डॉ. एस. एम. सूर्यवंशी यांच्याकडे परीक्षा नियंत्रकपदाचा कार्यभार देण्यात आला. सूर्यवंशी यांच्यानंतर विद्यापीठाचेच अतिरिक्त कुलसचिव दीपक वसावे यांच्याकडे या पदाची जबाबदारी आली.
परीक्षा विभागाच्या कारभाराला वळण लावण्यासाठी मग विद्यापीठाने डॉ. सुभाष देव यांची परीक्षा विभागाचे संचालक म्हणून नियुक्ती केली. तोपर्यंत संचालक हे पद या विभागात अस्तित्वातही नव्हते. डॉ. देव यांनी आपल्या काळात विभागाची घडी सुधारण्याचा बराच प्रयत्न केला, पण वर्षभरात त्यांनीही प्रकृतीचे कारण पुढे करत संचालकपदाची जबाबदारी वाहण्यास असमर्थता दर्शवून रत्नागिरीतील आपले महाविद्यालय गाठले. नंतर दीपक वसावे यांच्याकडेच परीक्षा विभागाची जबाबदारी होती.
मे, २०१३मध्ये सीएचएम महाविद्यालयात कार्यरत असलेल्या डॉ. देशमुख यांची परीक्षा नियंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी परीक्षा विभागाची घडी बसविण्याचा प्रयत्न केला, मात्र सात महिन्यांतच त्यांनीही राजीनामा देत आपल्या महाविद्यालयात परतण्याचा निर्णय घेतल्याने हा विभाग पुन्हा निर्नायकी झाला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th Jan 2014 रोजी प्रकाशित
मुंबई विद्यापीठात परीक्षा नियंत्रक टिकेना
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक डॉ. पद्मा देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे परीक्षांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या परीक्षा विभागाचा कारभार पुन्हा एकदा निर्नायकी झाला आहे.
First published on: 28-01-2014 at 02:09 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Exam controllers post of mumbai university remain empty