यंदाच्या वर्षीपासून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देताना उमेदवारांना प्रयत्नांच्या दोन संधी जास्त देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम बदलण्यात आलेला नाही, असे केंद्रीय लोकसेवा आयोगाने म्हटले आहे.
२०१४ मध्ये नागरी सेवा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना सर्व गटात वय शिथिलतेसह दोन प्रयत्न जास्त करण्याची संधी देण्यात येईल. अभ्यासक्रम व परीक्षेच्या स्वरूपात काहीही बदल केलेला नाही. आतापर्यंत लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सर्वसाधारण गटातील उमेदवार चार प्रयत्न करू शकत होते,त्यांना आता सहा प्रयत्न करता येतील तर अनुसूचित जाती व जमातींचे उमेदवारांना किती प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण व्हावे याचे बंधन नव्हते. इतर मागास वर्गीयांना सात प्रयत्न करण्याची मुभा होती आता ते नऊ प्रयत्न करू शकतील नागरी सेवा परीक्षा ही आयएएस, आयपीएस, आयएफएस सेवांसाठी अधिकारी निवडण्यासाठी घेतली जाते. त्यात प्राथमिक, मुख्य परीक्षा व नंतर मुलाखत असे तीन टप्पे असतात.
यावर्षी ही परीक्षा २४ ऑगस्टला होणार आहे. जो उमेदवार २१ वर्षे पूर्ण आहे पण वयाची तिशी गाठलेली नाही तेच या परीक्षेला बसू शकतात असा पात्रता निकष आहे. कमाल वयाची मर्यादा अनुसूचित जाती-जमातींसाठी पाच वर्षे, तर इतर मागासवर्गीयांसाठी तीन वर्षे शिथिल आहे.
जम्मू-काश्मीरमधील १ जानेवारी १९८० ते ३१ डिसेंबर १९८९ या काळात अधिवासी असलेल्या उमेदवारांना कमाल वयाची अट पाच वर्षे शिथिल आहे. युद्धात अपंग झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही अट तीन वर्षांसाठी शिथिल आहे. अंध, मूक-बधिर, इतर अपंग यांच्यासाठी वयाची कमाल अट १० वर्षे शिथिल आहे. परीक्षेची सविस्तर माहिती ३१ मे रोजी प्रसिद्ध होणाऱ्या रोजगार समाचार व एम्प्लॉयमेंट न्यूज या नियतकालिकात देण्यात आली आहे, असे यूपीएससीने म्हटले आहे.
वयाची मर्यादा
वयाची मर्यादा आता खुल्या गटात ३२, इतर मागास गटात ३५ तर मागास गटांसाठी ३७ वर्षे करण्यात आली आहे.