शिक्षक भरती परीक्षा (सीईटी) उत्तीर्ण असतानाही परीक्षेच्या उत्तरतालिकेमध्ये झालेल्या चुकीमुळे जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांना चार वर्षे झगडावे लागले. न्यायालयाच्या निर्णयामुळे या विद्यार्थ्यांना आता नोकरी मिळणार असली, तरीही ज्या अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले त्यांच्यावर मात्र काहीही कारवाई झालेली नाही. दरम्यानच्या काळात यातील अनेक उमेदवार सुपरवाझर, हॉटेलमध्ये वेटर अशी कामे करत आहेत. चुका करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी या विद्यार्थ्यांकडून होत आहे.
पुनर्मूल्यांकनामध्ये उत्तीर्ण ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमी पात्रतेच्या काही विद्यार्थ्यांनाही नियुक्ती मिळाली होती. त्यामुळे नियुक्तीसाठी या विद्यार्थ्यांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेचा निकाल लागून विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी ४ वर्षे गेली. मात्र, ज्या अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले, त्यांच्यावर अजूनही काही कारवाई झालेली नाही. यातील काही अधिकारी शिक्षण विभागात आजही वरिष्ठ पदांवर काम करत आहेत, तर काही निवृत्त झाले आहेत.
या चार वर्षांमध्ये हे विद्यार्थी काय करत होते?
अनेक विद्यार्थी काही खासगी शाळांमध्ये नाममात्र वेतनावर काम करत आहेत, काहींनी छोटय़ा शहरांमध्ये खासगी शिकवण्या सुरू केल्या आहेत. अनेकांना नोकरी न मिळाल्यामुळे इस्त्रीचे दुकान चालवणे, भाजीचे दुकान चालवणे अशी कामे करत आहेत. यापैकी बांधकामावर देखरेखीचे काम करणाऱ्या एका विद्यार्थ्यांने सांगितले, ‘‘घरची परिस्थिती चांगली नसल्यामुळे नोकरी करणे भाग होते. मात्र, खासगी शिक्षणसंस्थेमध्ये अर्ज केल्यावर नोकरी देण्यासाठी १५ लाख रुपये मागितले. त्यामुळे सध्या बांधकामावर देखरेखीचे काम करत आहे.’’ दुसरा एक उमेदवार हॉटेलमध्ये वेटरचे काम करत आहे, ‘‘मी शिकत होतो. तेव्हा डीएडसाठी खूप मागणी होती आणि शिक्षक व्हायची आवड असल्यामुळे मी डीएड केले.
आताच्या गुणांनुसार मला सहज नोकरी मिळणे शक्य होते. मात्र, अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे मला नोकरी मिळाली नाही. अपात्र उमेदवारांना नोकरी दिल्याचे प्रतिज्ञापत्र शासनानेच या याचिकेमध्ये सादर केले आहे. चार वर्षे बेकार राहणे शक्य नव्हते. म्हणून आता हॉटेलमध्ये नोकरी करत आहे.’’
राज्यात २०१० मध्ये शिक्षक भरतीसाठी सामाईक प्रवेश परीक्षा झाली होती. त्या परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झालेले साधारण ३ हजार ३०० विद्यार्थी हे पुनर्मूल्यांकनामध्ये उत्तीर्ण ठरले. यामध्ये २ हजार ४५४ विद्यार्थी मराठी माध्यमाचे, ६६८ विद्यार्थी उर्दू माध्यमाचे आणि १७८ विद्यार्थी हे इतर माध्यमांचे होते. या परीक्षेच्या निकालामध्ये चुका झाल्या होत्या. त्या चुका दुरुस्त करून त्यानंतर या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाले. मात्र, या विद्यार्थ्यांचा पुनर्मूल्यांकनाचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच त्यांना अपात्र ठरवून शिक्षण विभागाने भरती प्रक्रियाही केली होती.
