मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राजन वेळूकर यांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळेस याचिकाकर्त्यांच्या वतीने नवे मुद्दे उपस्थित करण्यात आले असून त्यावर सुनावणीच्या वेळेस युक्तिवाद करण्यास उच्च न्यायालयाने बुधवारी हिरवा कंदील दाखवला.
वेळूकर यांनी कुलगुरुपदासाठीचा अर्ज निश्चित वेळेनंतर केल्याचा आणि तो करताना व्याख्याते म्हणून आपल्या अनुभवाची कागदपत्रे सादर करताना दिशाभूल केल्याचे दोन प्रमुख मुद्दे नव्याने सुरू असलेल्या सुनावणीच्या वेळेस याचिकाकर्त्यांकडून उपस्थित करण्यात आल़े मात्र त्याला वेळूकर आणि विद्यापीठाकडून विरोध करण्यात आल्यावर न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाने मुख्य न्यायमूर्तीकडून त्यावर सुनावणी घेणे शक्य आहे की नाही हे स्पष्ट करून घेण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा व न्या़ मनोज संकलेचा यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली. वेळूकरांविरोधीच्या याचिकेवर सर्वप्रथम याच खंडपीठासमोर सुनावणी झाली होती. मात्र निकाल देतेवेळी मुख्य न्यायमूर्ती शहा आणि न्यायमूर्ती गिरीश गोडबोले यांच्या मतभेद झाल्याने प्रकरण एकसदस्यीय पीठाकडे पाठविण्यात आले होते. परंतु एकसदस्यीय पीठाकडे त्यावर तोडगा निघू न शकल्याने आता न्या़ हरदास व न्या़ गडकरी यांच्यापुढे या प्रकरणी आता नव्याने सुनावणी सुरू आहे. मात्र सुरुवातीच्या मुद्दय़ांपुरतीच ही सुनावणी नियमित ठेवण्याचे मुख्य न्यायमूर्तीनी प्रकरण वर्ग करताना स्पष्ट केले होते. त्यामुळे नव्या मुद्दय़ांवरील चर्चेचा मुद्दा पुन्हा त्यांच्यासमोर मांडण्यात आला. त्याला हिरवाकंदील दाखवण्यात आला़