News Flash

‘गोकुळ’च्या ‘बहुराज्य’ला आता संचालकांचाही विरोध

राज्यातील सर्वात मोठा दूध संघ अशी गोकुळची ओळख आहे.

वादाला आता विधानसभा निवडणुकीची किनार

दयानंद लिपारे, कोल्हापूर

‘गोकुळ’ला बहुराज्य दर्जा मिळण्यास आता संचालक मंडळातूनही विरोध होऊ लागला आहे. संघाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी ‘गोकुळ’च्या बहुराज्यकरणाला विरोध दर्शवला आहे. दरम्यान राधानगरी मतदारसंघात आघाडीच्या उमेदवारीसाठी त्यांनी ‘गोकुळ’चे संचालकपद पणाला लावले असले; तरी विधानसभा निवडणुकीची समीकरणे पाहता त्यांचा हा निर्णय आत्मघातकी ठरण्याची चिन्हे आहेत.

राज्यातील सर्वात मोठा दूध संघ अशी गोकुळची ओळख आहे. अशा गोकुळचा बहुराज्य दर्जा देण्याचा निर्णय लोकभावनेचा विरोधात असल्याचे सांगत डोंगळे यांनी विरोध केला आहे. त्यासाठीं ते संघाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. संघाचे तीनवेळा अध्यक्षपद भूषवलेले डोंगळे यांनी गोकुळच्या बहुराज्यकरणाला विरोध दर्शवल्याने खळबळ उडणे स्वाभाविक आहे.

डोळा विधानसभा निवडणुकीवर

दरम्यान डोंगळे यांचा या बहुराज्य दर्जास विरोध करण्यामागे आगामी विधानसभा निवडणुकीची किनार असल्याचे बोलले जात आहे. ‘गोकुळ’च्या बहुराज्यला विरोध करत आघाडीतर्फे राधानगरीतून निवडणूक लढविण्याचे डोंगळे यांचे मनसुबे असल्याचे बोलले जात आहे. यासाठी त्यांनी ‘गोकुळ’चे संचालकपद पणाला लावले आहे. मात्र राधानगरीचे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्याविरोधात आघाडीकडून लढण्यासाठी आधीच अर्धा डझन इच्छुक आहेत. त्यात राष्ट्रवादीच्या आजी-माजी अध्यक्षांचा समावेश आहे. त्यातून डोंगळे यांना संधी किती यावर प्रश्नचिन्ह लागले आहे.

महाडिक-डोंगळे संघर्ष

विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेल्या डोंगळे यांनी महादेवराव महाडिक यांनाच अंगावर घेतले आहे. ‘‘गोकुळ’च्या बहुराज्य विरोधात डोंगळे आत्ताच का बोलू लागले आहेत,’ अशी विचारणा करीत महाडिक यांनी ‘त्यांना विधानसभा लढवायची असली तरी १०-१५ हजाराच्या पुढे मजल नाही’ असे म्हणत डोंगळे यांच्यावर टीका केली आहे. त्यावर डोंगळे यांनी ‘महाडिक यांनी मला मिळणाऱ्या मतांची काळजी करू नये’ असा पलटवार केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2019 2:21 am

Web Title: board of directors opposed gokul multi state status zws 70
Next Stories
1 कोल्हापूरमध्ये आता जलवाहिनीद्वारे गॅस मिळणार – चंद्रकांत पाटील
2 पराभव विसरून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे – शेट्टी
3 तिवरे धरण फोडणाऱ्या खेकड्यांवर कलम ३०२चा गुन्हा दाखल करा
Just Now!
X