येथील सोन्या मारुती चौकानजीक असणाऱ्या साळी गल्लीमध्ये नवीन बांधकामासाठी मशीनच्या साहाय्याने केलेल्या खुदाईमुळे तीन मजली इमारत शुक्रवारी ढासळली. इमारतीमधील परिवार पहाटेच बाहेर पडल्याने या घटनेमध्ये सुदैवाने जीवितहानी टळली. शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मशीनच्या साहाय्याने २५ फुटांपेक्षा जास्त खुदाई केल्याने शेजारील इमारतीच्या पायास धक्का लागल्याने ही दुर्घटना घडल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. संबंधित कंत्राटदार करण माने याच्यावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान या घटनेमध्ये काजवे कुटुंबीयांचे ५० लाखांहून अधिकचे नुकसान झाले.
शहराच्या मध्यवर्ती परिसर तसेच जुन्या कोल्हापूरची ओळख असणाऱ्या शनिवार पेठ परिसरात दाटीवाटीने इमारती तसेच जुन्या पद्धतीची अनेक बांधकामे आहेत. बहुसंख्य इमारती एकमेकाला खेटून उभ्या आहेत. याच ठिकाणी करण माने यांच्या कॉर्नर स्टोन कंपनीच्या नावे बांधकाम सुरू केले आहे. या जागेवर भव्य अपार्टमेंट उभारण्याच्या कामासाठी पायाखुदाईचे काम गेल्या तीन महिन्यांपासून सुरू आहे.
खुदाई सुरू असलेल्या ठिकाणी शेजारील जागेवर चांदी व्यावसायिक असणाऱ्या प्रकाश मोहन काजवे यांचे दुमली घर आहे. खुदाई करताना कोणाची काही हरकत घेतली नाही मात्र खुदाईचे खोल होत गेल्यावर काजवे परिवाराने आक्षेप घेतला. महिनाभरापूर्वी खुदाई २० फुटांपर्यंत गेले, त्या वेळी काजवे यांच्या इमारतीला हादरे बसू लागले. त्या वेळी काजवे यांनी संबंधित कामगार आणि विकसक माने यांना याबाबत माहिती दिली. पण त्याकडे माने यांनी दुर्लक्ष करीत खुदाईचे काम सुरूच ठेवले.
दरम्यान गुरुवारी (दि.२१) रात्री िभतीला तडे जात असल्याने आणि शेजारच्या इमारतीपासून काजवे यांची इमातरत निसटत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आल्याने बघ्याची गर्दी जमली. दोन इमारतींमध्ये असणाऱ्या पोकळीतील माती, विटा पडू लागल्या होत्या. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही इमारत शेजारच्या इमारतीपासून सुटली आणि पाहता पाहता शेजारी खणलेल्या खड्डय़ात कोसळली. स्वतच्या डोळ्यासमोर घर कोसळताना पाहणाऱ्या प्रकाश काजवे यांना जबर मानसिक धक्का बसला. त्यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सोन्या मारुती परिसरात इमारत कोसळल्याची वार्ता वाऱ्यासारखी शहरात पसरली. शहरात दुमजली इमारत कोसळली, ही बहुतांशी पहिलीच वेळ असल्याने शहरवासीयांत खळबळ माजली. या परिसरात बघ्यांची गर्दी जमली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान तातडीने मदतकार्यासाठी आले. त्यांचे मदतकार्य सुरू असताना महापालिकेचे अधिकारी, पदाधिकारी यांनी येऊन पाहणी केली. घटनेचा पंचनामा करण्यात आला असून नुकसान भरपाई देण्याबाबतच्या कारवाई करण्यात येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Jan 2016 रोजी प्रकाशित
कोल्हापुरात इमारत कोसळली; जीवितहानी टळली
काजवे कुटुंबीयांचे ५० लाखांहून अधिक नुकसान
Written by लोकसत्ता टीम

First published on: 23-01-2016 at 03:40 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Building collapsed in kolhapur no mortality