भाकप कार्यकर्त्यांचा सवाल

कुख्यात गुंड छोटा राजन पोलिसांना सापडतो मग ज्येष्ठ विचारवंत गोविंदराव पानसरे यांचे मारेकरी पोलिसांना का सापडत नाहीत, असा उद्विग्न सवाल भाकप कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्यासमोर यांच्यासमोर उपस्थित केला. पानसरे व दाभोलकर यांच्या खुनातील आरोपींना अतिरेकी जाहीर करून सनातन संस्थेवर बंदी घालावी अशी मागणीही भाकपच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांना देण्यात आले.

पानसरे हत्याप्रकरणातील वकिलांच्या नेमणुकीबाबत गरसमज निर्माण होत असून याबाबत पोलीस अधीक्षकांनी वस्तुस्थिती जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली. पानसरे हत्येचा तपास सध्या सुरू आहे की बंद आहे, असा सवाल चळवळीतील कार्यकर्त्यांना पडत आहे यामुळे याबाबत खुलासा करण्याची मागणीही भाकपच्या वतीने करण्यात आली.पानसरे हत्येचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे. या प्रकरणाच्या प्रगतीचा अहवाल दर महिन्याला उच्च न्यायालयात सादर केला जातो. यामुळे तपास थांबला असे म्हणणे चुकीचे आहे. दोनच दिवसांपूर्वी एसआयटी प्रमुख संजयकुमार यांच्याशी चर्चा केली असून आमचे पहिले टाग्रेट सारंग अकोळकर व विनय पवार यांना पकडण्याचे असल्याचे मोहिते यांनी शिष्टमंडळास दिले.

या वेळी स्मिता पानसरे, नामदेव गावडे, सतीशचंद्र कांबळे, कृष्णात जाधव, सम्राट मोरे, अनिल चव्हाण, ग. धो. पाटील, बी. एल. बरगे, प्रशांत आंबी उपस्थित होते.