आघाडीची बिघाडी आणि महायुतीची माती झाल्याने कोल्हापूर महापालिकेच्या आखाडय़ात चौरंगी लढत अपरिहार्य बनल्याने सक्षम उमेदवारांचा शोध घेताना सर्वच पक्षांच्या मर्यादा उघड झाल्या आहेत. महापालिकेवर पक्षाचा झेंडा फडकण्याचे स्वप्न प्रमुख चार पक्ष पाहत असले तरी तगडय़ा उमेदवाराची उणीव तीव्रपणे जाणवू लागली आहे. पक्षांनी पहिली यादी कशीबशी जाहीर करून अब्रू राखली असली, तरी आता दुसरी-अंतिम यादी जाहीर करताना त्यांच्या नजरा प्रतिस्पर्धीच्या यादीकडे लागल्या आहेत. विरोधकांची यादी जाहीर झाली की त्यांच्यातील नाराजांना आपल्या गोटात खेचण्याची चाल या पक्षांकडून होणार असल्याचे जाणवत आहे.
केंद्र व राज्यातील सत्ता बदलाचा परिणाम महापालिका निवडणुकीतही दिसतो आहे. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका काबीज करण्याचा मनसुबा व्यक्त करून स्थानिक पातळीवर सक्षम मानल्या गेलेल्या ताराराणी आघाडीशी मत्री करतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटना व रिपाइं या मित्र पक्षांनाही जोडले आहे. त्यामुळे शिवसेनेचा तिळपापड झाला आहे. एकाकी पडलेल्या शिवसेनेने ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे. दुसरीकडे सत्तारूढांमध्येही स्वबळावर लढण्याची भाषा होऊन तशी वाटचालही सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जनस्वराज्य शक्ती पक्षाशी हात मिळवणी करून सर्वप्रथम उमेदवारांची पहिली यादी जाहीर करीत एक पाऊल पुढे टाकले आहे. पालिकेत सर्वाधिक सदस्यसंख्या असलेल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्वबळावर लढताना चांगलीच दमछाक होत आहे. अन्य पक्षांनी पहिली यादी जाहीर केली, तरी काँग्रेसच्या यादीला अजून मुहूर्त मिळायचा आहे.
भाजप, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस अशा चारही पक्षांना स्वबळाचे शिवधनुष्य पेलणे किती कठीण आहे, याची जाणीव आता जाणवत आहे. त्याची तीव्रता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांना अधिकच भेडसावत आहे. मुळातच गतवेळेपेक्षा यंदा आणखी पाच प्रभागांची वाढ झाली आहे. त्यातच मित्रपक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत. परिणामी, एकूण ८१ प्रभागात सक्षम उमेदवार शोधताना पक्षनेतृत्वाची दमछाक होत आहे. यंदा प्रथमच महिलांची संख्या निम्मी असल्याने निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांचा शोध घेणे आणखीनच कठीण बनले आहे. आता स्वबळावर लढणाऱ्या आणि अंतर्गत गटबाजीने त्रस्त झालेल्या सेनेला सर्व प्रभागातून उमेदवारांची निवड करणे जिकिरीचे बनले आहे. तुलनेने ताराराणी आघाडीशी जमवून घेतलेल्या भाजपाला उमेदवार शोधांचा त्रास कमी असला तरी संघटनात्मक ताकद कमी असलेल्या या पक्षाला दुसऱ्या यादीत कोणत्या उमेदवारांना संधी द्यायची, याची विवंचना सतावत आहे.
सक्षम उमेदवारांचा शोध घेताना निर्माण झालेल्या अडचणींवर उपाय म्हणून आता सर्वच पक्ष अन्य पक्षातील सक्षम पण नाराज उमेदवारांवर भिस्त ठेवून आहेत. त्यासाठी सर्वच पक्ष दुसरी-अंतिम यादी कधी प्रसिद्ध होते, याकडे डोळे लावून बसली आहे. त्यातूनही हाती चांगले उमेदवार न सापडल्यास नवख्या उमेदवारांच्या गळ्यात माळ घालून पक्ष कार्यकर्त्यांना संधी दिल्याचा डांगोरा पिटण्याची राजकीय चाल खेळण्यास नेते मंडळी न करतील तर नवल.