कोल्हापूर : सहकार तत्त्वावरील महानंदा या दूध महासंघास आर्थिकदृष्टय़ा भक्कम करण्यासाठी गोकुळने हातभार लावण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा दूध संघाने राज्याचा शिखर दूध संघ असलेल्या संस्थेस मदत करण्याचा हा निर्णय उल्लेखनीय ठरला आहे.
मुंबई येथील गोकुळची प्रतिदिन दूध विक्री ७ लाख लिटर आहे. वाशी येथील दुग्धशाळेत प्रतिदिन ५ लाख लिटर पॅकिंग होते. ३ लाख लिटर पॅकिंग हे इग्लू डेअरी सव्र्हिसेस या खासगी कंपनीकडून प्रती लिटर १ रुपये ६० पैसे दराने पॅकिंग करून घेतले जात होते. करार नूतनीकरण करण्यासाठी त्यांनी ९ टक्के (प्रतिलिटर १४ पैसे) दरवाढीची मागणी होती. ही वेळ महानंदा महासंघास सक्षम करण्याची आहे हे ओळखून गोकुळने हातभार लावावा अशी भूमिका ग्रामविकास हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांनी घेतली. त्यांनी गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील व महानंदाचे अध्यक्ष रणजित देशमुख यांच्याशी चर्चा करून सहकार्य करण्याचा सल्ला दिला.
वार्षिक १० कोटींची बचत
संचालक मंडळाच्या निर्णयाप्रमाणे गोकुळने दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या दालनामध्ये करार पत्रावर स्वाक्षरी केली. महानंदाच्या गोरेगाव या दुग्धशाळेत प्रती लिटर १ रुपये ५५ पैसे या दराने पॅकिंग करण्याचा निर्णय घेतला. यामुळे गोकुळचे प्रति लिटर १४ पैसे बचत होऊन वार्षिक १ कोटी ५५ लाख रुपयांची तसेच अतिरिक्त रोजंदारी नोकर कपातमुळे ३ कोटी १२ लाख रुपयांची आणि मुंबई, पुणे टँकर वाहतूक १७ पैसे कपातीमुळे ५ कोटी ३२ लाख रुपयांची वार्षिक बचत होणार आहे. दूध उत्पादकास जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. दुग्ध व्यवसायच्या वाढीच्या उद्देशाने गोकुळ व महानंदा यापुढे एकत्रित काम करणार आहे, असे सतेज पाटील म्हणाले. गोकुळचे संचालक अरूण डोंगळे, महानंदाचे उपाध्यक्ष डी. के. पाटील, कार्यकारी संचालक श्यामसुंदर पाटील, गोकुळचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर उपस्थित होते.