25 November 2017

News Flash

टोलनंतर हेल्मेटसक्तीविरोधात कोल्हापूरकरांना यश!

कोल्हापूर शहरात १५ जुल पासुन हेल्मेट सक्ती करणार असल्याचे पोलीस प्रशासनातर्फे जाहीर केले .

दयानंद लिपारे, कोल्हापूर | Updated: July 15, 2017 1:04 AM

हेल्मेटसक्ती कोल्हापूरकरांनी सध्या तरी हाणून पाडली आहे.

ह्यला विरोध . त्याला विरोध. असे ढोल वाजवत राहणाऱ्या कोल्हापूरकरांनी हेल्मेट सक्ती विरोधात दंड थोपटले आणि त्याविरोधात आंदोलनाची भाषा सुरू करीत पोलीस प्रशासनाला नमते घेण्यास भाग पाडले. आंदोलनानंतर टोल बंद पाडल्यावर  आता हेल्मेटसक्ती कोल्हापूरकरांनी सध्या तरी हाणून पाडली आहे.

अपघाती मृत्यू आणि जखमींचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्रात टप्प्या -टप्प्याने हेल्मेट सक्ती करण्याचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी कोल्हापूरसह पाचही जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांना दिले होते. त्यासाठी त्यांनी प्रबोधनही सुरु केले असताना हेल्मेट सक्तीला कोल्हापूरकरांनी जोरदार विरोध केला . लोकप्रतिनिधींसह, नेटकर, सामान्य नागरिक, वाहनधारकानी हेल्मेट वापराचे महत्व मान्य केले पण त्याच्या वापरातील अडचणी , बेशिस्त वाहतूक व्यवस्था, महापालिकेच्या खराब, खड्डेयुक्त रस्त्यांचा पाढा वाचला . तो इतका प्रभावी ठरला कि हेल्मेट सक्ती करण्याचा पोलिसांचा ’विश्वास’च खचला !

प्रवासात मृत्यू , जखमी होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने हेल्मेट सक्ती करण्याचा आदेश दिला. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी शासन , प्रशासन यांचे नेटाने प्रयत्न सुरु आहेत. मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद , पुणे येथे हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी होणार आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यात हेल्मेटची सक्ती करण्यात येणार आहे. परंतु ही सक्ती नसून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी आहे, असे परिवहनमंत्री दिवाकर रावते गतवर्षी सांगितले होते. त्याच्याही पुढे जात जात त्यांनी ‘हेल्मेट नाही तर पेट्रोल नाही’, असा नियम करण्यात आल्याचे जाहीर केले होते . मात्र दुचाकी वाहनधारक , ग्राहक संघटनांनी सरकारच्या या निर्णयाचा विरोधा सुरु केला . मंत्र्यांची भूमिकाच पुढे नेत कोल्हापुरात नांगरे यांनी हेल्मेट सक्ती ही नागरिकांच्या हिताचीच आहे, असे सांगून त्याला जनजागृतीचीची जोड दिली . पण या भूमिकेला कोल्हापुरातील शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनीच विरोध दर्शवला .

कोल्हापूर शहरात १५ जुल पासुन हेल्मेट सक्ती करणार असल्याचे पोलीस प्रशासनातर्फे जाहीर केले . हेल्मेट सक्ती करण्याच्या विरोधात कोल्हापूरमध्ये यापुर्वीही आंदोलन झाले आहेत. शहरात हेल्मेट सक्ती करण्यापेक्षा शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर पोलीस प्रशासनाने भर देणे दिला पाहिजे . हेल्मेट सक्तीच्या आदेशामुळे दुचाकी चालकास वेठीस धरले जाणार असल्याने शहरात हेल्मेट सक्ती न करता वाहन चालकांचे प्रबोधन करण्याची मागणी आमदार क्षीरसागर यांनी केली .

हेल्मेट सक्तीच्या निर्णयाला स्थगिती

अर्थात या मागणीमागे समाज माध्यमातून हेल्मेट सक्तीला कडाडून होणार विरोध हे मुख्य कारण होते . नेटकरांनी समाज माध्यमातून हेल्मेट सक्तीतील दोषांवर नेमकेपणे बोट ठेवले . कोल्हापूर महापालिकेच्या खराब , खड्डेयुक्त रस्त्यांवर प्रहार चढवत आधी रस्ते आणि वाहतूक व्यवस्था सुधारा आणि मग हेल्मेट सक्तीच्या मागे लागा , असे खडे बोल सुनावले गेले . हेल्मेट कंपन्यांच्या हितासाठी हा उद्योग सुरु असल्याचीही टीका होत राहिली . विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना उद्देशून तर टीकेचा पाऊस पाडला गेला .नागरिक , वाहनधारक, आमदार क्षीरसागर यांच्याकडून होणारा रोख लक्षात घेऊन नांगरे यांनी हेल्मेट सक्तीच्या निर्णयाला ’ब्रेक ’ लावला .

आता प्रबोधनाची दिंडी

हेल्मेट सक्तीच्या निर्णयापासून नमते घेणारया नांगरे यांनी आता हेल्मेट वापराचे महत्त्व विषद करणारी प्रबोधनाची दिंडी राबवण्याचे ठरवले आहे. सहा महिन्यांपासून वाहतुकीच्या विषयावर काम करत आहोत. त्यातून ५५० अपघात टळले, तर २८० जणांचे जीव वाचविण्यात यश आले. त्यामुळे ही मोहीम अधिक प्रभावी करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे नागरे-पाटील यांनी म्हटले आहे.

सामान्य वाहनधारक वेठीस – आमदार क्षीरसागर

आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले , हेल्मेट सक्तीच्या शहरांची भौगोलिक परिस्थिती पाहता सीमा मर्यादित आहेत.  हेल्मेट सक्तीच्या आदेशामुळे दुचाकी चालकांना वेठीस धरण्यास अधिकच वाव मिळणार असल्याने त्याला विरोध आहे . प्रबोधनाच्या कार्याला सहकार्य करण्यात येईल , असे त्यांनी ’लोकसत्ता’ला सांगितले .

गणेशोत्सवात मंडळांचे प्रबोधन

हेल्मेट सक्तीला विरोध करणाऱ्या कोल्हापूरकरांनी गणेशोत्सवात मंडळांद्वारे प्रबोधन करण्यात पुढाकार घेण्याचे ठरवले आहे . गणेशोत्सवाच्या मंडपाला परवानगी देताना पोलिस प्रशासनाने हेल्मेट बाबतचे प्रबोधनात्मक फलक लावण्याची सक्ती केल्यास हरकत असणार नाही. प्रत्येक मंडळाच्या दारात या प्रबोधन फलकामुळे हेल्मेटबाबतचा पोलिस प्रशासनाना प्रबोधनाचा हेतू साध्य होईल , असे सांगत माजी महापौर , समितीचे आर. के. पोवार यांनी या चांगल्या सूचनेला मंडळांचा पाठिंबा राहील असे स्पष्ट केले .

First Published on July 15, 2017 1:04 am

Web Title: no helmet compulsory in kolhapur