News Flash

यंत्रमागधारकांचे प्रश्न पंधरा दिवसांत सोडवू

सवलतीच्या दराने वीजपुरवठा आणि कर्जाच्या व्याजात अनुदान देण्याचा प्रस्तावही तयार केला आहे.

 

अर्जुन खोतकर यांचे आश्वासन

यंत्रमागासाठी सवलतीच्या दराने वीजपुरवठा आणि कर्जाच्या व्याजात ५ टक्के अनुदान देण्याचा प्रश्न १५ दिवसांत सोडवण्याचे लेखी आश्वासन वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी बाळ महाराज यांना दिले. त्यामुळे उपोषणाच्या दहाव्या दिवशी बाळ महाराज यांनी उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले. मात्र खर्चीवाल्यांच्या मागण्यांसाठी यंत्रमाग बंद ठेवून लाक्षणिक उपोषण सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले.

सवलतीच्या दराने वीजपुरवठा करावा, कर्जाच्या व्याजात ५ टक्के अनुदान मिळावे, खर्चीवाल्यांना मजुरीवाढ मिळावी, या प्रमुख मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी इचलकरंजी येथे बाळ महाराज यांनी १७ डिसेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत होती. आंदोलनाच्या आजच्या दहाव्या दिवशी वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन देशमुख यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन यंत्रमाग उद्योगाच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. सवलतीच्या दराने वीजपुरवठा आणि कर्जाच्या व्याजात अनुदान देण्याचा प्रस्तावही तयार केला आहे. १५ दिवसांत यावर निर्णय होणार असल्याने आंदोलन मागे घेण्याची विनंती बाळ महाराज यांना केली. बाळ महाराज यांनी यंत्रमाग उद्योगाची सद्य:स्थिती विशद करून शासनाच्या वतीने मंत्री खोतकर यांनी मागण्यांबाबत वेळेचे बंधन घालून निर्णयाचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले. तसेच खर्चीवाल्यांच्या मागण्यांबाबत लाक्षणिक उपोषण सुरू राहणार असल्याचे सांगून ट्रेिडगधारकांनी ४ दिवसांत सकारात्मक निर्णय न घेतल्यास या विरोधात आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशाराही दिला. या वेळी मंत्री खोतकर यांच्या हस्ते बाळ महाराज आणि अमोद म्हेतर यांनी भाकरी खाऊन आमरण उपोषण मागे घेतले. दरम्यान, मंत्री खोतकर यांनी पत्रकार बठक घेऊन यंत्रमाग उद्योगाच्या समस्या सोडवण्याला शासनस्तरावर गती आली असून, लवकरच त्याची अंमलबजावणी होईल. स्थानिक पातळीवरील खर्चीवाल्यांचा प्रश्न सोडवण्याबाबत जिल्हाधिकारी, प्रांताधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून, हा प्रश्न न सुटल्यास प्रसंगी शासनस्तरावर हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. बाळ महाराज यांनी शासन आणि प्रशासन मागण्यांबाबत ढिम्म असल्याचे आंदोलनातून दिसून आले असले तरी यंत्रमागधारकांच्या उद्रेकाची शासनाला दखल घ्यावी लागली हे खोतकर यांच्या लेखी आश्वासनावरून स्पष्ट होत असल्याचे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 1:08 am

Web Title: power loom holders question issue
Next Stories
1 राजकारणातून निवृत्त होऊ मात्र महाडिक गटाशी युती यापुढे नाही
2 सेंद्रिय शेतीला महत्त्व देण्यासाठी ५९७ कोटी खर्चाची तरतूद
3 नगरसेवक-अधिकारी यांच्यातील संघर्षांचे आणखी एक प्रकरण
Just Now!
X