दुसऱ्या चरणात सुरू झालेल्या हस्ताच्या पावसाने रविवारीही जोरदार हजेरी लावत दडी मारलेल्या काळातील भरपाई सुरूच ठेवली. रविवारी विटय़ाच्या रेवानगर डोंगरावर जनावरे चारण्यासाठी गेलेला तरूण वीज पडून जागीच ठार झाला. खानापूर, आटपाडी, मिरज, पलूससह अनेक भागात पावसाने आज धुमाकूळ घालीत सरासरीच्या दिशेने जोरदार आगेकूच सुरू ठेवली. आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी १०.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस पलूस येथे २४.५ मिलिमीटर नोंदला गेला.
सलग चौथ्या दिवशी जिल्ह्याच्या बहुतांश भागात आज पावसाने दमदार हजेरी लावली. आज दुपारी एकच्या सुमारास विटय़ाजवळ रेवानगर येथे डोंगरावर वीज पडून दादासाहेब आबा पवार वय ३६ हा तरूण जागीच ठार झाला. तो डोंगरावर जनावरे चारण्यासाठी गेला होता.
आटपाडी, दिघंची येथे दुपारी दोन तास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. तसेच कुंडल, पलूस परिसरातही पावसाने हजेरी लावली. मिरज तालुक्यातील खंडेराजुरी, आरग, खटाव, िलगणूर परिसरातही दमदार पाउस झाला. सांगलीत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या असल्या तरी कुपवाड परिसरात जोरदार पाऊस झाला. कळंबी तानंग परिसरात पाऊस झाल्याने मिरज मालगाव रस्त्यावरील ओढय़ाला सायंकाळी पूर आला होता.
आज सकाळी संपलेल्या २४ तासात तालुका स्तरावर नोंदला गेलेला पाऊस असा- पलूस २४.५, मिरज ११.१, जत २.९, खानापूर १३.६, वाळवा २.३, तासगाव ११.२, शिराळा १४.२, आटपाडी ०.३, कवठेमहांकाळ १.३ आणि कडेगाव २३.२ मिलिमीटर.