स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी हे करोनामुक्त झाले असून पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातून त्यांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे पुढील काही दिवस ते आता शिरोळ घरी होम क्वारंटाइन राहणार आहेत. फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत राजू शेट्टी यांनी आपल्याला करोनाची बाधा झाल्याची माहिती दिली होती.

राजू शेट्टी यांनी मागील महिन्यात राज्यभर दौरा, आंदोलन केले होते. यादरम्यान त्यांना करोनाची बाधा झाली. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातील त्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. ते घरीच क्वारंटाइन होऊन वैद्यकीय उपचार घेत होते. गेल्या बुधवारी त्यांच्या रक्तामध्ये दोष आढळल्याने जयसिंगपूर येथील डॉ. सतीश पाटील यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना प्राणवायूचा पुरवठा करण्यात आला होता. तर, पुढील वैद्यकीय उपचार चांगल्या पद्धतीने व्हावेत यासाठी दुसऱ्या दिवशी पुणे येथे हलवण्यात आले. प्राणवायू पुरवठा असलेल्या रुग्णवाहिकेतून त्यांना मंगेशकर रुग्णालयात दाखल केले होते.

राजू शेट्टी यांनी व्हिडीओत काय म्हटलं होतं?

“१ सप्टेंबरला माझी करोना टेस्ट निगेटिव्ह होती. मात्र ८ सप्टेंबरला माझी करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. ८ तारखेला मी घरीच होतो. डॉ. सतीश पाटील आणि इतरांनी चर्चा करुन ठरवलं की घरीच उपचार द्यायचे, त्यामुळे मी घरीच उपचार घेतो आहे.”

८ सप्टेंबरला त्यांनी हे म्हटलं होतं. मात्र, ९ तारखेला त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तसेच राजू शेट्टी यांची पत्नी आणि मुलगा सौरभ या दोघांचीही करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. सुरुवातीला सगळे घरीच क्वारंटाइन झाले होते.