21 October 2020

News Flash

‘जेसीबी’ लावून शिवपुतळा हटवणे संतापजनक – संभाजीराजे

शिवरायांचा पुतळा नुकताच जेसीबी लावून पाडल्यामुळे राज्यात सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

कोल्हापूर : मध्यप्रदेशमधील छिंदवाडा येथे असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ‘जेसीबी’ लावून पाडण्याचे तिथल्या सरकारचे कृत्य हे संतापजनक असून याबद्दल तेथील काँग्रेस शासनाने त्वरित माफी मागावी, अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.

मध्यप्रदेश राज्यात छिंदवाडा येथे शिवरायांचा पुतळा नुकताच जेसीबी लावून पाडल्यामुळे राज्यात सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेबद्दल संभाजीराजे छत्रपती यांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे. या घटनेबद्दल मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकारला जाब विचारताना संभाजीराजे यांनी म्हटले आहे, की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा थेट जेसीबी लावून पाडण्याचे हे कृत्य संतापजनक आहे. या घटनेचा ‘व्हिडिओ’ पाहून मन हेलावून गेले. आपण कुणाचा पुतळा आणि तो कशा पद्धतीने तोडत आहोत, याचेही भान या सत्ताधाऱ्यांना राहिलेले नाही. या घटनेची थोडीजरी लाज असेल तर मध्यप्रदेशमधील काँग्रेस सरकारने आणि त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांनी त्वरित माफी मागावी. अन्यथा जनाक्रोश एवढा जास्त आहे की त्याची झळ त्यांना लागल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही संभाजीराजे यांनी दिला आहे. असे कृत्य छत्रपतींचा वंशज म्हणून कदापीही सहन करु शकत नाही, असेही ते म्हणाले.

‘काँग्रेसला राष्ट्रपुरुषांचे वावडे’

काँग्रेसशासित नांदेड महानगरपालिका व मध्यप्रदेश येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा व फलकांची प्रशासनाकडून विटंबना केली गेली आहे. तर, राजस्थान शासनाने सर्व शाळांमधील असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमा हटविण्याचे आदेश दिले आहेत. काँग्रेसच्या या कृत्याने त्यांना राष्ट्रपुरुषांचे वावडे असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे, अशी टीका कोल्हापूर महानगर भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2020 1:44 am

Web Title: sambhaji raje reaction over removing statue of chhatrapati shivaji maharaj zws 70
Next Stories
1 तरुणीच्या छेडछाडीवरून कृषी महाविद्यालयात वाद
2 ‘व्हॅलेंटाइन डे’साठी शिरोळच्या गुलाबाला जगपसंती!
3 दिल्ली विजयाचा कोल्हापुरात ‘आप’कडून जल्लोष
Just Now!
X