मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून जवळपास ८० गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. एनडीआरएफची टीम सांगलीत दाखल झाली असून लोकांना त्यांच्या घरातून बाहेर काढत बचावकार्य सुरु आहे. पुरामुळे तब्बल १८ हजार लोक स्थलांतरित झाले असून सुखरुप ठिकाणी नेण्यात आलं आहे. कराड तालुक्यातील रेठरे गावही पुराचं पाणी शिरलं असून जवळ असणाऱ्या शिरटेसहित अनेक गावांना फटका बसला आहे. सांगलीतील मारुती चौकातील बाजारपेठेतही पाणी शिरलं आहे. शिरगावमध्ये एनडीआरएफच्या टीमकडून मदतकार्य सुरु असून गावात तीन हजार लोक अडकले आहेत.

मुसळधार पावसामुळे सांगली आणि कोल्हापुरात रविवारी रात्रीपासून महापुराने हाहाकार उडाला आहे. कृष्णा आणि कोयनेला आलेल्या पुराने सांगली तर पंचगंगेच्या पाण्याने कोल्हापुरातील अनेक भागांत पाणी घुसले आहे. नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले असून, हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या दोन्ही शहरांतील पूरस्थिती पाहता राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला पाचारण करण्यात आलं आहे.

कोल्हापूर : शिरोली भागात पुरामुळे पुणे-बंगळूरू महामार्ग बंद

सतत सुरु असलेल्या पावसामुळे पुराचं पाणी रस्त्यावर आलं असून पुणे-बंगळुरु महामार्गावरील वाहतुकीलाही फटका बसला आहे. कोल्हापूर-बेळगाव-बंगळुरु रस्ते वाहतुकीसाठी ठप्प झाले आहेत. किणी टोलनाक्यावर तर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. बेळगाव-कोल्हापूर महामार्गावर पाण्यात अडकलेली बस जेसीबीने ओढून काढण्यात आली.

कोल्हापूर, सांगलीला पुराचा वेढा..

कोल्हापूर जिल्ह्यात सातत्याने पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शिरोली भागात पुणे-बंगळूरू महामार्ग पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मुसळधार पावसामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील केकले परिसरातील ज्योतिबा डोंगराचा काही भाग खचला असून डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहे.

कोल्हापूरात जवळपास ३० वर्षांपूर्वीचा विक्रम पावसाने मोडला आहे. ३० वर्षांपूर्वी पंचगंगा ५० फुटांच्यावरुन वाहत होती. त्यानंतर यावर्षी पंचगंगेने ५० फुटांची पातळी गाठली आहे. त्यामुळे कोल्हापूर जवळून जाणारा पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवण्यात आला आहे.