साखरसम्राटांचे नेते शरद पवार आणि साखर कारखानदाराविरुद्ध सातत्याने संघर्षांचा शड्ड ठोकणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी हे दोन टोकांवर असलेले बलिष्ठ नेते प्रथमच एका मंचावर येत आहेत. सदाभाऊ खोत यांच्याशी फिसकटल्यावर राजू शेट्टी यांना वेगळ्या पर्यायांचा विचार करावा लागणार असून, पवारांबरोबर एकाच कार्यक्रमाला उपस्थिती याचा वेगळा अर्थ काढला जात आहे.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे माजी अध्यक्ष, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे हे संस्थापक असलेल्या आणि माजी वस्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे हे अध्यक्ष असलेल्या जवाहर सहकारी साखर कारखान्याच्या  रौप्यमहोत्सवी ऊस गाळप हंगाम शुभारंभ प्रसंगाच्या निमित्ताने चंदेरी नगरी  हुपरी येथे हे दोन विरुद्ध बाजूचे नेते एकत्र येत असताना एक नवे राजकीय समीकरणही आकाराला येत असताना दिसत आहे. कार्यक्रमाचे संयोजक प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसपासून घेतलेली फारकत आणि भाजप प्रवेशास आलेली आडकाठी पाहता आता ते पवारांशी असलेल्या जुन्या नात्याची सय काढत हातावर घडय़ाळ बांधून घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे .

तीन दशकापूर्वी हातकणंगले तालुक्यातील जवाहर साखर कारखान्याची उभारणी ही अशक्यकोटीतील बाब बनली होती. पण पवारांशी असलेल्या सलोख्याच्या संबंधामुळे आणि तेव्हा प्रकाश आवाडे यांच्याकडे लाल दिवा असल्याने कारखान्याला परवानगी मिळाली आणि त्यातून साखरनिर्मितीही होऊ लागली. अर्थात, पवारांनी गेली चार दशकाहून अधिक काळ आवाडे यांच्या राजकीय, सहकार, शैक्षणिक कार्याला भरभरून मदत केल्याने आवाडे पिता-पुत्रांची कारकीर्द बहरत गेली.

राजकारणापलीकडे पवारांची आवाडेंना मदत

पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यावर आवाडे  हे त्यांची पाठराखण करतील असे वाटत होते, पण त्यांनी हातात हात ठेवणे पसंत केले. परिणामी दोनदा पवारांमुळे खासदार झालेल्या कल्लाप्पाण्णा आवाडे यांना राष्ट्रवादीच्या निवेदिता माने यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. पण, ही कटुता अल्पकाळ टिकली. पण मागील लोकसभा निवडणुकीला शेट्टी  यांच्याविरुद्ध कल्लाप्पाण्णा आवाडे यांना उभे करण्याची शक्कल पवारांचीच. आवाडे काँग्रेसशी बांधिलकी जोपासत राहिले तरी पवारांच्या पाठबळामुळे त्यांना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्षपद मिळाले होते. आवाडे पितापुत्र काँग्रेसमध्ये राहिले तरी त्यांच्या संस्थात्मक कार्याला पवारांनी ओंजळ  भरून  मदत करण्यात कसूर ठेवली नाही. याचे स्मरण ठेवत आवाडे यांनी यंदा उसाची मोळी गव्हाणीत टाकण्याचा शुभारंभ पवारांच्या हस्ते करण्याचे प्रयोजन केले असून २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी हा कार्यक्रम होणार आहे.

प्रथमच पवार-शेट्टी एका मंचावर

राज्यातील नव्हे तर देशभरातील सहकारी साखर कारखानदारीचे नेतृत्व गेली कित्येक वष्रे शरद पवारांच्या हाती आहे. त्यातूनच साखरसम्राटांचे नेते अशी बिरुदावली त्यांना चिकटली आहे. साखर कारखानदारीला सतत काही ना काही अडचणींचा सामना करावा लागतो, तेव्हा साखर कारखानदारांची पावले गोविंद बागेकडे वळत असतात. याउलट साखर कारखानदारी आणि या कारखानदारांचे अनभिषिक्त सम्राट असलेले पवार हे शेतकरी संघटनेचे कायमचे लक्ष्य  ठरले आहे.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी  यांनी संघटनेच्या जन्मापासून पवारांवर आसूड ओढण्याची एकही संधी कधी सोडली नाही. इतकेच नव्हे तर उसाला दर मिळण्यासाठी  बारामतीमध्ये जाऊन आंदोलन करत थेट पवारांना ललकारण्याचे कामही त्यांनी केले. स्वाभाविकच पवार – शेट्टी हे दोघेही कायम एकमेकाला पाण्यात पाहताना दिसून आले. त्यामुळे एकमेकांची जिरविण्याची भाषा करणारे पवार आणि शेट्टी हे प्रथमच एकत्र आल्यावर तोंडात साखरेचा गोडवा ठेवून बोलणार कि पूर्वीच्याच कटुतेची पुनरावृत्ती करणार याकडे साखर कारखानदारासह ऊस उत्पादक शेतकरयानांचेही लक्ष लागून राहिले आहे. शेतीमधील मोदींपेक्षा शेट्टी यांना अधिक कळते असे म्हणत शेट्टींची पवारांनी नुकतीच पाठ थोपटली होती. तर , शेट्टी यांच्या अलीकडच्या भाषणात पवारांविषयाचा तिखटपणा अंमळ कमी झाला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बरोबरीने त्यांनी साखर कारखान्यांचे  प्रश्नही त्यांनी मोदी, जेटली, पासवान यांच्या दरबारात उपस्थित केले आहेत. या अर्थाने त्यांनी साखर कारखानदारांत सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्नही चालवला आहे. पवार- शेट्टी यांच्यातील हा बदलता रंग एकत्रित आल्यावर कसा खुलणार याचे कुतूहलही निर्माण झाले आहे.

आवाडेंच्या राजरंगाची कसोटी

ऊस गळीत हंगामाच्या निमित्ताने आवाडे यांच्या राजकीय वाटचालीचे दिशादर्शन होणार आहे. ऊस गाळप हंगामाचा कार्यक्रम राजकारणविरहित असल्याचे प्रकाश आवाडे यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले. त्याच्या पुष्टय़र्थ त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यापासून ते त्यांचा भाजप प्रवेशाला खो घालणारे स्थानिक आमदार सुरेश हाळवणकर, काँग्रेसमध्ये आधार असलेले पतंगराव कदम यांच्यापासून  काँग्रेसविषयी  नाराजी होण्यास कारणीभूत ठरलेले जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी . एन . पाटील , जिल्हा परिषद निवडणुकीपासून जवळीक साधलेले राजू शेट्टी आणि कोल्हापूर , सांगली , बेळगाव जिल्ह्य़ातील सर्व खासदार, आमदार यांना निमंत्रित केल्याकडे लक्ष वेधले . वरकरणी हे सारे पटणारे असले तरी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवाडे यांचा  आगामी राजकीय प्रवासही  अधोरेखित होणार आहे . निमंत्रित केलेल्या साऱ्या पक्षातील प्रमुख पाहता हे सारे पक्ष त्यांना खुणावत आहेत. खेरीज, भरीस भर म्हणून पवारांशी जुन्या नात्याला नव्याने कल्हई केली जात आहे.