कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातून वाहणाऱ्या कृष्णा, पंचगंगा या दोन्ही नद्या आत्यंतिक प्रदूषित झाल्याने त्यांचे शुद्धीकरण तातडीने करावे, या मागणीसाठी ग्रामीण भागात  नृसिंहवाडी, औरवाडसह आठ गावांत बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला सर्व पक्षांनी पाठिंबा जाहीर केला होता. नृसिंहवाडी येथे अनंत धनवडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी प्रदूषणाचा विषय ऐरणीवर आला आहे. या दोन नदीकिनारी मोठी शहरे वसली आहेत. पंचगंगा नदीवर कोल्हापूर, इचलकरंजी तर कृष्णा नदीवर कराड सांगली ही शहरे आहेत. या शहर व परिसरातील रसायनयुक्त औद्योगिक सांडपाणी तसेच सांडपाणी या नद्यांमध्ये सोडले जात असल्यामुळे पाणी प्रदूषित झाले आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी, या मागणी करता या बंदचे आयोजन करण्यात आले होते.

नृसिंहवाडीसह बुबनाळ, औरवाड, गौरवाड, आलास, कवठेगुलंद, शेडशाळ, गणेशवाडी आदी गावांत उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. त्याला पूर्णत: प्रतिसाद मिळाला. सर्व गावांतील व्यापारी नित्याचे व्यवहार बंद ठेवून यामध्ये सहभागी झाले होते. फेरीचे रूपांतर जाहीर सभेत झाले.

सभेत जिल्हा परिषद सदस्या परवीन दादेपाशा पटेल, पंचायत समिती सदस्या रूपाली मगदूम, सरपंच ललिता बरगाले, डॉ मुकुंद घाटे पुजारी, डॉ किरण अनुजे, वकील प्रकाश भेंडवडे, रणजित पाटील मल्लाप्पा चौगुले, मुकुंद पुजारी सावकार, धनाजीराव जगदाळे, माजी सरपंच विभावरी गवळी, विनिता पुजारी आदींनी नदीच्या  दूषित पाण्यामुळे होणारे दुष्परिणाम याविषयी  सविस्तर माहिती दिली. नायब तहसीलदार जे. वाय. दिवे यांना मागणी संदर्भात निवेदन देण्यात आले.

 

वारणा निधीवर शिरोळकरांचा डोळा

इचलकरंजी शहरासाठी असलेल्या नळपाणी जनतेसाठी ७० कोटींचा निधी शासनाने मंजूर केला आहे. तो कृष्णा व पंचगंगा शुद्धीकरणासाठी वापरावा. त्यामुळे सर्वानाच शुद्ध पाणी मिळेल, अशी मागणी शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केली. दत्त उद्योग समूह ठामपणे आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी दिली.