कोल्हापूर: कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील १७ विद्यार्थी सोमवारी इस्त्रो अभ्यास पाहणीसाठी रवाना झाले. इयत्ता ५ वी च्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत अव्वल स्थान मिळवले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांची इंडियन स्पेस रिसर्च ऑरगनायझेशनच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली आहे. या अभ्यास दौऱ्यासाठी आज प्रशासनाधिकारी शंकर यादव यांच्या नेतृत्वाखाली दोन मार्गदर्शक शिक्षक, एक महिला डॉक्टर व १७ विद्यार्थ्यांच्यासह बेंगलुरुकडे रवाना झाले आहेत. कोल्हापूरच्या शैक्षणिक इतिहासात हे प्रथमच घडले आहे.
हेही वाचा >>> कोल्हापूर शेतकरी संघाच्या निवडीत महायुतीची सरशी; अध्यक्षपदी प्रवीणसिंह पाटील, राजसिंह शेळके उपाध्यक्ष
महानगरपालिकेच्या प्रशासक के.मंजुलक्ष्मी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून ‘भविष्यात अशा प्रकारचे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सर्वांनी यशस्वी व्हावे’ अशा शुभेच्छा दिल्या. याचा खर्च महानगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे. आज मुलांना सहलीस पाठवण्यासाठी मुलांच्या पालकांनी व नातेवाईकांनी महापालिकेत तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी केली. कोल्हापूरच्या परिवहन विभागातर्फे विद्यार्थ्यांना विमानतळापर्यंत नेण्यासाठी खास विशेष बसचे आयोजन केले होते. सकाळी महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीतील चौकामधून विशेष बसमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन प्रथम जिल्हाधिकारी कार्यालय येथे आणण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रशासक के.मंजूलक्ष्मी, पोलिस अधिक्षक महेंद्र पंडित, इचरकरंजीचे प्रशासक ओमप्रकाश दिवटे व अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांच्या उपस्थितीत प्रत्येक यशस्वी विद्यार्थ्यास प्रमाणपत्र, शुभेच्छापत्र व करंडक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.