इचलकरंजीतील संभाजी चौक परिसरातील तीन दुकानांना लागलेल्या आगीत सुमारे १२ लाख रुपयांचे रुपयांचे नुकसान झाले.
याबाबत घटनास्थळ व पोलिसातून मिळालेली माहिती अशी, संभाजी चौक परिसरातील लंगोटे मळा येथे श्रीकांत पाटील यांचे शैलजा गारमेंट नामक तयार कपडय़ांचे दुकान आहे. तर या दुकानालगत संतोष काटकर यांचे लाइफ केअर मेडिकल व कल्याणी वडोद यांचे केएम नॉव्हेल्टीज हे कॉस्मेटिक दुकान आहे. गुरुवारी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास शैलजा गारमेंट या दुकानातून धूर येत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी ही घटना तत्काळ जवळच राहण्यास असलेल्या पाटील यांना दिली. पाटील यांनी येऊन दुकान उघडले असता आत आग लागल्याचे दिसून आले. तर काही नागरिकांनी अग्निशामक दलाला पाचारण केले. तयार कपडे व लाकडी छत असल्याने आगीने बघता बघता रौद्ररूप घेतले होते. आढय़ाला लागलेली आग पसरून शेजारील दुकानांना लागली. नागरिकांनीही पाण्याचा मारा करीत आग विझवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता. अग्निशामक दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जवानांनी तासभराच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली. पण तोपर्यंत तिन्ही दुकानांतील साहित्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. तर शॉर्टसíकट झाल्याने भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने आग विझवताना अडचणी निर्माण होत होत्या.
या प्रकरणी श्रीकांत मलगोंडा पाटील (वय ४४, रा. संभाजी चौक) यांनी पोलिसात वर्दी दिली असून तिन्ही दुकानांचे मिळून ११ लाख ८० हजार रुपये नुकसान झाल्याचे नमूद केले आहे.