कोल्हापूर : ‘बाहेर गोंधळ आत शांतता’ असा काहीसा विरोधाभास अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत दिसून आला. चित्रपट महामंडळाच्या संचालक मंडळातील वादामुळे हाणामारी पासून न्यायालयीन संघर्ष निर्माण झाला असताना दीर्घकाळापर्यंत झालेल्या आजच्या बैठकीत सर्व विषय मंजूर करतानाच सभा खेळीमेळीत झाल्याचा दावा करण्यात आला. हा प्रकार पाहून सभासद बुचकळ्यात पडल्याचे समाज माध्यमात व्यक्त होणाऱ्या संदेशातून दिसत आहे.

चित्रपट महामंडळाचा गेल्या काही वर्षांतील कारभार नानाविध वादामुळे गाजत आहे. वार्षिक सभेला तर आखाड्याचे स्वरूप प्राप्त झालेले असते. परिणामी महामंडळाचे कामकाज तीन महिन्यांपासून ठप्प आहे. न्यायालयीन वादामुळे अगोदरच महामंडळाची निवडणूक रखडली आहे. त्यामुळे विद्यमान कार्यकारिणीला बैठक घेऊन खर्चाचे इतिवृत्त धर्मदाय आयुक्त कार्यालयास सादर केल्याशिवाय कोणताच खर्च करता येत नव्हता. कर्मचारी पगार, कार्यालयीन बिले, ज्येष्ठ सभासद मानधन असे खर्च प्रलंबित होते. याबाबत जोरदार चर्चा सभासदांमध्ये सुरू झाल्याने अखेर आज कार्यकारी मंडळाने कोल्हापूर कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते.

हेही वाचा >>>ताराराणींवर टपाल तिकीट, पुस्तक, नाटक आणणार; आशिष शेलार, साडेतीनशेवी जयंतीनिमित्त घोषणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या अध्यक्षतेखाली दीर्घकाळ बैठक होवून १० विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. थकीत पगार, कार्यालयीन खर्च करण्यावर एकमत झाले. दोन वर्षांत झालेले नुकसान सर्वांनी मिळून भरून काढण्याचा संकल्पही करण्यात आला. महामंडळाची नवीन इमारत, धर्मदाय कार्यालयाशी संपर्क करून रखडलेले प्रश्न लवकरच सोडवणार असल्याची माहिती दिली. उपाध्यक्ष धनाजी यमकर, संजय ठुबे, संचालक रणजित जाधव, विशेष निमंत्रित सभासद बाबा पार्टे, आकाराम पाटील, महेश पन्हाळकर, ॲड. प्रशांत पाटील, कर सल्लागार पद्मप्रभू रणदिवे, रवींद्र बोरगावकर उपस्थित होते.