एकाकी जीवन कंठत असलेल्या फिरस्त्या वृद्ध व्यक्तीचा गोळी घालून खून करण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. नारायण रावबा देसाई (वय ७२) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
नारायण देसाई ही व्यक्ती गेल्या काही काळापासून अर्धशिवाजी पुतळय़ाजवळील वांगी बोळ परिसरात राहात होती. एकाकी जीवन जगणाऱ्या या व्यक्तीची पत्नी सहा वर्षांपूर्वी मरण पावली होती. तर मुलगी विवाहित आहे. बंधू नामदेव देसाई हे शेतकरी सहकारी संघामधील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. त्यांनीच आज पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. नामदेव देसाई यांना फुलेवाडी येथील राजेंद्र डावरे या भाच्याचा फोन आला होता. मामा नारायण हे निवृत्ती चौक परिसरात जखमी अवस्थेत पडले असल्याची माहिती त्याने दिली होती.
त्यावर नामदेव देसाई यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता भाऊ नारायण मृत झाल्याचे दिसले. मृताच्या कपाळ व कानाच्या पाठीमागील बाजूस जखम होऊन रक्त येत असल्याचे दिसले. त्यानंतर सीपीआर इस्पितळातील डॉक्टरांनी शवविच्छेदन केले असता गोळी घातल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले. तथापि कोणत्या कारणामुळे खून झाला असावा याचा शोध पोलीस घेत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jan 2016 रोजी प्रकाशित
वृद्ध व्यक्तीचा गोळी घालून खून
जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल
Written by लोकसत्ता टीम

First published on: 09-01-2016 at 03:10 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aged persons murder with firing