अजित पवार यांचा सवाल; सत्तेच्या नादी लागल्याने धग संपल्याची टीका

शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी उद्ध्वस्त होत आहे, महामार्ग बांधणीच्या नावाखाली ओलिताखालील हजारो एकर जमीन शासन दडपशाही करून बळकावत आहे, असे शेतकऱ्यांचे कितीतरी प्रश्न गंभीर बनले असताना शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण करणारे खासदार राजू शेट्टी व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत मूग गिळून गप्प का बसले आहेत. आघाडी सरकारच्या काळात कराड, बारामती येथे आंदोलन करणारे हे नेते आता नागपूरला आंदोलन करण्यास का कचरत आहेत, असा  सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपस्थित केला. जयसिंगपूर येथे विरोधी पक्षांची संघर्ष यात्रा पोहोचली असता शेतकरी सभेचे आयोजन करण्यात आले होते.

शिरोळ या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बालेकिल्ल्यात झालेल्या सभेवेळी शेट्टी-खोत यांच्यावर वक्त्यांनी टिकास्त्र सोडले. स्वाभिमानाची ऊस परिषद भरणाऱ्या विक्रमसिंग मदानावरच सभा भरवून स्वाभिमानीच्या दुकलीची पिसे काढली. विरोधकांनी सत्तेच्या नादी लागल्याने त्यांच्यातील आंदोलनाची धग संपल्याची कडवी टीका या वेळी करण्यात आली. शेतकरी प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र व राज्य शासनाच्या कारभाराचे वाभाडेही काढण्यात आले.

शेवटची कर्जमाफी- अजित पवार

राज्य शासनाने शेतकऱ्यांचा अंत न पाहता आता एकदाची आणि अखरेची कर्जमाफी करावी, पुन्हा कर्जमाफी देण्याची गरज नाही, अशी मागणी अजित पवार यांनी केली. पण हे करतानाच स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे शेतीमाल उत्पादन खर्चाच्या दीडपट  हमीभाव देण्याचे धोरण राबवावे, अशी मागणी त्यांनी केली.