२०१९ सालच्या निवडणुका शिवसेनेने भाजपाची युती करून लढवल्या होत्या. निकालानंतर त्यांच्या तोंडाला पाणी सुटले. तत्त्व सोडून शरद पवारांच्या चरणी मुख्यमंत्री करा म्हणून बसले. पण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून भारतीय जनता पक्षाने त्यांना धडा शिकवला आहे , अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. भारतीय जनता पक्षाच्यावतीने आज सायंकाळी कोल्हापुरात विजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमित शहा यांनी ठाकरे यांचा कठोर शब्दात समाचार घेतला.
हेही वाचा- “असंगाशी संग केल्याने त्यांना रस्त्यावर आणून सोडले”; देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका
गतवेळच्या निवडणुकीचा संदर्भ देऊन शहा म्हणाले , मागील निवडणुक शिवसेना – भाजपने एकत्रित लढवली होती. प्रचार सभेमध्ये मोदी यांचा फोटो मोठा आणि उद्धव ठाकरे यांचा छोटा होता. भाजप देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्वाखाली निवडणूक लढवून मोठे यश मिळाले. मात्र विधानसभा निवडणूक निकालाचे आकडे पाहून त्यांच्या तोंडाला पाणी सुटले. मुख्यमंत्री पदासाठी हे शरद पवार यांच्या चरणी जाऊन बसले. तत्वाशी मोडतोड करणाऱ्यांना भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवून धडा शिकवला आहे. कुटील बुद्धी काही काळ यश मिळवते. शेवटी खरेपणाची प्रचिती येते, असा टोला शहा यांनी ठाकरे यांना लगावला.
हेही वाचा- ‘कमळ’ फुलवण्यासाठी अमित शहा कोल्हापूरच्या आखाड्यात; सहकार क्षेत्रातही लगबग
सर्व ४८ जागा जिंकण्याचा निर्धार
आता महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. गेल्या लोकसभा वेळी ४२ जागांवर विजय मिळवला होता. यावर पक्ष संतुष्ट नाही आता सर्व ४८ जागांवर विजय मिळवून त्या मोदींच्या पदरात टाकण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध होऊया, असे आवाहन शहा यांनी केले. भाजप शिंदे यांची शिवसेना यांनी महाराष्ट्रात पुन्हा वर्चस्व करूया असे आवाहन शहा यांनी केले.