कोल्हापूर : शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मन मोठे आहे. प्रकाश आबिटकर मागे फिरा. खुल्या मनाने स्वीकार केला जाईल, असे आवाहन करतानाच शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी बंडखोरी केल्यास सामान्य शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा सोमवारी दिला.
शिवसेनेत अंतर्गत वाद निर्माण झाला आहे त्याचे पडसाद कोल्हापूर जिल्ह्यात उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर दुधवडकर यांनी आज आजरा येथे शिवसैनिकांशी संवाद साधला. ते म्हणाले आमदार आबिटकर यांच्या जीवाला धोका असेल तर त्यांनी सांगावे. त्यांना संरक्षणातून आणले जाईल. त्यांचे बंधू अर्जुन आबिटकर यांच्याकडे चौकशी केली. दरम्यान आबिटकर सुरक्षित असल्याचे चित्रफितीद्वारे समोर आले आहे. आबिटकर यांनी अमिषाला बळी पडू नये. बंडखोरी केल्याने सामान्य शिवसैनिकांची वाईट प्रतिक्रिया उमटते. आर्थिक व्यवहार, ईडीची भीती दाखवून आमदारांना भाजपने बंडखोरी करण्यास भाग पाडले आहे, असा आरोप त्यांनी केला. माजी आमदार राजेश क्षीरसागर व शहर प्रमुख रवी इंगवले यांच्यातील संघर्ष वैयक्तिक असल्याचे स्पष्टीकरणही दुधवडकर यांनी केले.



