मराठी पदनामांना महापालिकेत काळे फासले

बेळगाव महापालिकेतील महापौर, उपमहापौर व आमदारांच्या नामफलकावरील मराठी शब्दांना काळे फासण्यात आले. तर बेळगावात अटक केलेल्या ३७ तरुणांना शनिवारी जामीन मिळण्याची शक्यता असताना सरकारी वकील अनुपस्थितीत राहिल्याने याबाबतचे कामकाज होऊ शकले नाही.

काळ्या दिनाच्या मिरवणुकीत मराठी भाषकांचा सहभाग कर्नाटक शासन व कन्नडिगांची झोप उठवणारा होता. त्यातून मराठी द्वेषाची गरळ ओकली जाऊ लागली आहे. बेळगाव महापालिकेत पोलीस संरक्षण असतानाही शनिवारी कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. महापौर सरिता पाटील, उपमहापौर संजय शिंदे यांच्यासह आमदार संभाजी पाटील, आमदार संजय पाटील यांच्या कक्षाबाहेर असलेल्या फलकावरील मराठी अक्षरांना काळे फासले. फलकावर मराठी, इंग्रजी व कन्नड भाषेत नामोल्लेख करण्यात आलेला असतो. याबाबत महापौर सरिता पाटील  म्हणाल्या, गेल्या तीन दिवसांपासून महापालिकेत पोलीस संरक्षण आहे. खेरीज, पोलीस मुख्यालय हाकेच्या अंतरावर आहे. तरीही महापालिकेत अशा प्रकारचा हल्ला कसा होऊ शकतो. त्यांना पोलिसांनी रोखले का नाही. यातून शासनाची प्रवृत्ती दिसते. करवाढीचा मुद्दय़ावर तहकूब झालेली सभा घेण्यासाठी नगरसेवक महापालिकेत जमलो होतो, पण या प्रकारामुळे सभा होऊ शकली नाही. तर आज संध्याकाळी राज्य शासनाने करवाढ का केली नाही, अशी विचारणा करत करणे दाखवा नोटीस लागू केली आहे.

काळा  दिन आंदोलनात सहभागी झालेल्या ३७ तरुणांना आज न्यायालयात आणण्यात आले होते. त्यांना आज जामीन मिळून सुटका होईल, अशी अटकळ मराठी भाषकांची होती. तथापि, सरकारी वकील हजर न झाल्याने कामकाज होऊ शकले नाही. रविवारी सुट्टी असल्याने सोमवापर्यंत ही प्रक्रिया रखडली असून यातून कानडी तिढय़ाच्या कारभाराचे दर्शन झाल्याचा तीव्र प्रतिक्रिया बेळगावात उमटल्या.

कोल्हापुरात पडसाद

या घटनेचे पडसाद कोल्हापुरात तीव्रपणे उमटले. शिवसेनेच्या वतीने पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कागल येथे कर्नाटकातील वाहने पुन्हा परत पाठवण्याची मोहीम जिल्हाप्रमुख विजय देवणे व संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली  राबवण्यात आली. तर बेळगावात मराठी युवकांना झालेल्या बेदम मारहाणीचा निषेध करीत कोल्हापूर शहरात शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर व शिसनिकांनी शिवाजी चौकात कर्नाटकी पोलिसांच्या प्रतिमेचे दहन केले.