जिल्हयातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील लाभार्थीच्या बँक खात्यात जमा होणारी रक्कम ‘इंडीया पोस्ट पेमेंट’ बँकेच्या माध्यमातून लाभार्थींना घरपोच केली जाणार आहे. ही रक्कम काढण्यासाठी लाभार्थींची बँकेत मोठी गर्दी होत असल्याने ती टाळण्यासाठी जिल्हा अग्रणी बँकेच्या पुढाकाराने आणि टपाल खात्याच्या सहकार्याने अशाप्रकारचा वेगळ्या पद्धतीचा उपक्रम जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी सुरु केला आहे.
जिल्हयातील विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील पात्र लाभार्थी पैसे काढण्यासाठी गर्दी करीत आहेत.
प्रक्रिया अशी..
बँकेतील गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी देसाई यांनी याप्रमाणे आदेश जारी केले आहेत. जिल्हयातील सर्व बँकांनी या योजनेतील लाभार्थींची गावनिहाय यादी जिल्हा अग्रणी बँकेकडे त्वरित सादर करावी. जिल्हा अग्रणी बँकेने यादी संकलित करून टपाल कार्यालयाकडे जमा करावी. टपाल कार्यालयाने ‘इंडीया पोस्ट पेमेंट बँके’च्या माध्यमातून लाभार्थींना घरी जावून योजनेतील जमा रक्कम त्यांना द्यावी.