कोल्हापूर : कोल्हापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या काळम्मावाडी नळ पाणी योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे सातत्याने तांत्रिक दोष उद्भवत असल्याने कोल्हापूरकरांना आठवडाभर तहानलेले राहावे लागत आहे. याला ही योजना राबवण्यासाठी अट्टाहास धरणारे आमदार सतेज पाटील या सर्व गोंधळाला कारणीभूत आहेत. त्यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली.
माजी नगरसेवक प्रा. जयंत पाटील, अजित ठाणेकर यांनी याबाबत विवेचन करताना सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले. प्रा. पाटील म्हणाले, काळम्मावाडी योजना राबवण्यासाठी सर्वांचेच हातभार लागले आहेत. त्यामध्ये सतेज पाटील, हसन मुश्रीफ, विनय कोरे यांच्यापासून अनेकांनी मदत केली आहे. परंतु सतेज पाटील हे योजना मीच राबवली अशा अविर्भावात सातत्याने वावरत राहिले. योजना अपुरी असतानाही अभ्यंग स्नान करून योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला.
परंतु, वर्ष झाले तरी या योजनेमध्ये सातत्याने तांत्रिक दोष उद्भवत आहेत. योजनेसाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्याचा हा परिणाम आहे. योजनेसाठी युनिटी सल्लागार, जीकेसीएल कंपनी यांची जबाबदारी आहे. या कंपनीकडून सात कोटी रुपयांचे नवीन पंप बसवणे गरजेचे आहेत. हे पंप गरजेच्या आधीच वापरल्याने ते आता वापरण्यायोग्य राहिलेले नाहीत, अशी टीकाही पाटील यांनी केली.
या योजनेच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असून या कामाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाकरावी (एसआयटी) चौकशी करण्यात यावी अशी मागणी करीत आहोत, असे ते म्हणाले.
काळम्मावाडी नळ पाणी योजनेला पर्याय म्हणून शिंगणापूर पाणी योजनेचे बळकटीकरण अवघ्या दोन – पाच कोटी रुपयांमध्ये होऊ शकते. त्यासाठी भाजपच्या वतीने प्रयत्न केले जाणार आहेत.या योजनेला भाजप खो घालते अशी टीका सतेज पाटील यांच्याकडून होऊ लागल्यानंतर तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व प्रकारच्या परवानग्या मिळवून दिल्या होत्या. ही परवानगी मिळवण्याची जबाबदारी सल्लागाराची होती. परंतु त्यांना सतेज पाटील यांच्याकडून अभय मिळाले, असा आरोपही त्यांनी केला. या योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला नाही हे पाटील यांनी शपथपूर्वक सांगावे, असे आव्हान पाटील यांनी दिले.