कोल्हापूर महानगरपालिका स्वीकृत नगरसेवकपदाकरिता निष्ठावंतांच्या फळीतून एकाची निवड करण्याच्या कसोटीच्या प्रसंगावर मात करीत अखेर शनिवारी सर्वपक्षीय नेत्यांनी एकाचे नाव निश्चित केले. आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे महापालिकेच्या आघाडी, पक्षाच्या गटनेत्यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. एकूण पाच जागांकरिता पाच नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात आली. या वेळी उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन केले.
नामनिर्देशन दाखल करणाऱ्यांमध्ये काँग्रेस विकास आघाडीतर्फे गटनेते शारंगधर देशमुख यांनी तौफिकअहमद अकबर मुल्लाणी व मोहन रामचंद सालपे, ताराराणी आघाडी पक्षातर्फे गटनेते सत्यजित कदम यांनी सुनील महादेव कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे गटनेते सुनील पाटील यांनी जयंत गोिवदराव पाटील, तर भारतीय जनता पक्ष व मित्र आघाडीतर्फे गटनेते विजय सूर्यवंशी यांनी किरण शांताराम नकाते यांचे नामनिर्देशनपत्र दाखल केले.
महापालिका निवडणूक संपल्यानंतर स्वीकृत सदस्य निवडीसाठी इच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्या होत्या. सत्तारूढ काँग्रेस पक्षाकडे दोन जागा असल्याने आमदार सतेज पाटील यांची कसोटी होती. तर राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ, भाजपचे नेते पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील तसेच ताराराणी आघाडीचे अध्यक्ष स्वरूप महाडिक यांना प्रत्येकी एक सदस्य निवडताना कसरत करावी लागली. अखेर वरीलप्रमाणे नावनिश्चिती होऊन त्यांचे अर्ज शनिवारी दाखल झाले असून, आगामी सभेत त्यांच्या स्वीकृत सदस्य नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.