कोल्हापूर: बाबरी मशीद ढाचा पाडण्याबाबत वादग्रस्त विधान करणारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात बुधवारी कोल्हापुरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मंत्री पाटील यांनी हिंदूंची माफी मागणी अशा घोषणा देण्यात आल्या. त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली.
बाबरी मशिद ढाचा पाडण्यात शिवसेनेचा संबंध नव्हता असे विधान मंत्री पाटील यांनी केले होते. या वक्तव्याच्या विरोधात कोल्हापुरात प्रतिक्रिया उमटत आहेत. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी काल चंद्रकांत पाटील यांनी जीभ सांभाळून वक्तव्य करावे अशी तिखट प्रतिक्रिया नोंदवली होती. तर आज ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात निदर्शने केली. त्यांच्या निषेध करणारी घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांनी चंद्रकांत पाटील राजीनामा द्या, असे फलक हातात घेतले होते.
आणखी वाचा- चंद्रकांतदादा पाटील यांनी वाणी सांभाळावी; बाबरी प्रकरणी कोल्हापुरात ठाकरे गटाची टीका
यावेळी विजय देवणे म्हणाले, चंद्रकांत पाटील हे सातत्याने वादग्रस्त विधान करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत. बाबरी मशीद आणि शिवसेना याबाबतचे त्यांचे विधान असेच वादग्रस्त ठरले असल्याने भाजपच्या एकाही नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिला नाही. अशाने त्यांचे पक्षातील स्थान आणखी घसरत राहील. त्यांनी ताबडतोब मंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली.