कोल्हापूर : कोल्हापूर सर्किट बेंच उद्घाटनासाठी आलेले भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांची रविवारी सामान्य नागरिकांपासून अनेक मान्यवरांनी भेट घेतली. महाराष्ट्राचे सुपुत्र असणारे सरन्यायाधीश यांनी या सर्किट बेंचसाठी घेतलेल्या पुढाकाराचे अनेकांनी मनासून कौतुक करून धन्यवाद दिले. एरवी सरन्यायाधीशांची भेट म्हणजे दुर्मिळ क्षण असतो. पण तो सर्किट बेंच शुभारंभच्या निमित्ताने लाभल्याने कोल्हापुरातील सामान्य जन आनंदले.

आज १७ ऑगस्टला सायंकाळी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सरन्यायाधीश भूषण गवई यांचे काल शनिवारी सायंकाळी कोल्हापूर येथे आगमन झाले. राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळाला अभिवादन करून ते सर्किट हाऊसला मुक्कामी पोहोचले. काल सायंकाळी देखील अनेक मान्यवरांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. यामध्ये त्यांना ओळखणाऱ्या सामान्य नागरिकांपासून तर विविध सरातील मान्यवर सहभागी झाले होते. कोल्हापूर शहरात आगमन झाल्यानंतर पुष्पवृष्टी करूनही त्यांचे रस्त्याने अनेक ठिकाणी स्वागत झाले होते.

आजही त्यांना भेटणाऱ्यांची रीघ कायम होती यामध्ये सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, पत्रकारिता, विधी व न्याय,कला व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग होता. सरन्यायाधीशांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांची यावेळी चर्चाही केली. त्यांनी सर्किट हाऊसच्या स्थापनेबाबत झालेल्या निर्णयाचा सहा जिल्ह्यातील नागरिकांना मोठा लाभ व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. या ठिकाणी पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हाव्यात उच्च दर्जाच्या सर्व सुविधा मिळाव्यात या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही दिल्या.

सर्किट बेंचसाठी ९ हेक्टर १८ आर जागा शेंडा पार्क येथे प्रस्तावित करण्यात आली आहे. या जागेसाठी शासनाची मान्यता मिळण्याबाबतची कार्यवाही सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांना दिली. दरम्यान सुमारे दीडशे वर्षांपूर्वी १८७४ मध्ये बांधलेल्या आणि कौटुंबिक न्यायालयासाठी वापरात असलेल्या इमारतीची माहिती सरन्यायाधीश भूषण गवई यांनी घेतली. या इमारतीचे नूतनीकरण करुन याठिकाणी डिव्हिजन बेंचचे काम सुरु होणार आहे. तसेच राधाबाई इमारतीमध्ये ग्रंथालय, नोंदणी विभाग व व्हिडीओ कॉन्फरन्स रुमचे कामकाज होणार असून याचीही माहिती त्यांनी पुणे विभागाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्याकडून घेतली. सर्किट हाऊसच्या हेरिटेज वास्तूविषयीही त्यांनी जाणून घेतले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

सोलापूर येथील कार्यक्रम आटपून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी कोल्हापूरला पोहोचले.त्यांच्यासोबत राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचेही आगमन झाले.तत्पूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही या कार्यक्रमासाठी विमानतळावर आगमन झाले.