The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
bsp mayavati
भाजप सत्तेत परतणे कठीण! मायावती यांच्या लोकसभा प्रचाराला सुरुवात
child who fell into the open canal rescued
सोलापूर: उघड्या कूपनलिकेत पडलेल्या बालकास सुखरूप बाहेर काढण्यास यश
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…

दयानंद लिपारे

कोल्हापूर : शेतकरी चळवळीची स्वत:च्या शिवारातून सुरुवात केलेल्या राजू शेट्टी यांच्या राजकीय प्रवासाचे एक वर्तुळ तीन दशकांच्या वेगवेगळय़ा सोयरिकीनंतर मंगळवारी पूर्ण झाले. आता स्वत:च्या शिवारातून त्यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा देत संघटनेचे राजकारण करण्याचा निर्णय घेतला आहे. रिडालोस, भाजप, महाविकास आघाडी अशा सलग तिन्ही निराशाजनक अनुभवानंतर ते परत ‘एकाला चलो रे’ म्हणत स्वतंत्रपणे पेरणी करण्यास सज्ज झाले आहे. राजू शेट्टी यांनी १९९०च्या दरम्यान शिरोळ तालुक्यात शेतकरी चळवळीचे काम सुरू केले. तेव्हा प्रबळ साखर कारखानदारांना धक्का देणे सोपे नव्हते. त्यातून ते शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या संपर्कात आले. याच वेळी देशाने खुले आर्थिक धोरण स्वीकारले होते. औद्योगिक वाटचाल विकसित होऊ लागल्याने उद्योग, सेवा क्षेत्र भरभराटीला येऊ लागले होते. पण शेतकऱ्यांचे प्रश्न पूर्वीसारखेच गंभीर होते. अशा आव्हानात्मक काळात जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेट्टी यांनी शेतकरी चळवळीचा माध्यमातून राजकीय पेरणी केल्याचे फळ म्हणून जिल्हा परिषदेवर निवड झाली. राजकीय वर्तुळाची एक त्रिज्या पुढे सरकली. ऊस दराच्या आंदोलनात मारहाण झाली आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रबळ साखरपट्टय़ात एक शेतकरी नेता प्रथमच विधानसभेवर शेतकऱ्यांच्या रूपाने निवडून गेला.

 भाजपला होकार अन् नकार

पुढे २००४ मध्ये लोकसभा निवडणुकीवेळी शरद जोशी यांनी भाजप-शिवसेनेसोबत राजकारण करण्याचा निर्णय घेतला. मात्र, जातिवादी पक्षाबरोबर जाणार नाही असे म्हणत शेट्टी यांनी संघटनेतून बाहेर पडून स्वत:च्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा झेंडा रोवला. २०१९ मध्ये राजू शेट्टी यांनी रिडालोसचा (रिपब्लिकन, डावी लोकशाही आघाडी) पाठिंबा घेऊन अपक्ष लढून लोकसभा निवडणूक विजय मिळवला. येथून त्यांचा ‘शिवार ते संसद’ हा प्रवास पूर्ण झाला. २०१४ साली लोकसभा निवडणुकीवेळी त्यांना भाजप जातिवादी नसल्याचा साक्षात्कार झाला. गोपीनाथ मुंडे यांच्या माध्यमातून त्यांनी भाजपबरोबर आघाडी करून दुसऱ्यांदा संसद गाठली. पुढे भाजपशीही त्यांचे जमले नाही. मोदी सरकारचा पाठिंबा काढून घेतला.

 ‘मविआ’लाही रामराम

२०१९ सालच्या निवडणुकीत त्यांना पश्चातबुद्धी झाली. शरद पवार (बारामती), हर्षवर्धन पाटील (इंदापूर) व  पृथ्वीराज चव्हाण (कराड) या तत्कालीन काँग्रेस- राष्ट्रवादीच्या मातब्बर मंत्र्यांच्या गावात शेट्टी यांनी केलेली शेतकरी आंदोलने प्रचंड गाजली. पण या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी या दोन्ही पक्षांशी गळाभेट केली. पण हा डाव काही जमला नाही. येथे त्यांचा पराभव झाला. दोन्ही काँग्रेसचे राज्यात सरकार आल्यावर स्थापन झालेल्या महाविकास आघाडीला शेट्टी यांनी पाठिंबा दिला खरा; पण अडीच वर्षांतच हाही राजकीय संसार मोडून पडला. आता त्यांनी भाजपही नको अन महाविकास आघाडीला रामराम ठोकला आहे. स्वबळावरच चळवळीची नांगरणी करण्याचा निर्णय मंगळवारी शेट्टी यांनी घोषित केला. आणि येथे त्रिज्या आणखी थोडी पुढे जाऊन स्वतंत्र लढण्याचा सुरू झालेल्या प्रवासाचे वर्तुळ पूर्ण झाले आहे.

राज्यातील सत्ताधारी अन् विरोधकांवरही टीका

शेट्टी यांचे बदलते राजरंग पाहता त्यांनी तत्कालीन परिस्थितीत सोयीचा तितकाच फायदेशीर राजकीय निर्णय घेतला. पाठिंबा दिलेल्या पक्षांनी त्यांचा वापर करून घेतला आणि त्या पक्षाच्या या माध्यमातून शेट्टी आणखी वरची पायरी चढत राहिले. प्रवासाचे चार टप्पे, त्यातील टक्केटोणपे याचा अनुभव पाहता कालच्या सभेत भाजप व मविआ या दोन्हींवर टीकेचे आसूड ओढलेल्या शेट्टी यांच्या पुढील राजकीय वाटचालीविषयी उत्सुकता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत कदाचित भाजप-शिवसेना यांनी एकत्रित लढायचे ठरवले तर शिवसेनेच्या विद्यमान खासदारांना उमेदवारी मिळणार हे नक्की. अशा वेळी शेट्टी अपक्ष रिंगणात उतरतील आणि मविआचा प्रत्यक्ष पाठिंबा मिळवतील, अशी शक्यता आहे. आणि भाजप- सेनेने स्वतंत्रपणे भिडण्याचे ठरले तर भाजपचा सक्षम उमेदवार म्हणून भाजप आणि शेट्टी यांच्यात हातमिळवणीच्या शक्यतेचा आणखी एक पर्याय आहे. भाजपकडून नव्या नावाचा शोध सुरू होण्यापूर्वीच त्यांनी मविआशी फारकत घेऊन आपले पत्ते आत्ताच खुले ठेवले आहेत. त्यामुळे एकाकी वाट तुडवत निघालेल्या या एकांडय़ा शिलेदाराची उद्या कोणाशी नवी राजकीय सोयरीक होईल याबाबत सद्य:स्थितीत अनिश्चितता असली तरी त्यांच्यासमोर पर्यायांचे शिवार खुलेच आहे.