कोल्हापूर : कोल्हापुरातील रस्ते कामांची पाहणी करण्यासाठी महापालिकेने अधिकाऱ्यांची पथक नियुक्त केले असले तरी शहरातील खड्ड्यांची दुरवस्था संपता संपत नाही. रस्त्यांवर निकृष्ट दर्जाचे पॅचवर्क केले जात असल्याने गुरुवारी काही भागात नागरिकांनी काम बंद पाडून अभियंत्यांना धारेवर धरले.

कोल्हापूर शहरातील रस्ते खराब झाले आहेत. रस्त्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेच्या जल अभियंत्याच्या आईचा खड्डे अपघातात मृत्यू झाला. या विरोधात आवाज उठवल्यानंतर महापालिकेच्या निद्रिस्त यंत्रणेला जाग आली. रस्ते कामांची पाहणी करण्यासाठी नियुक्त करण्यात आले असले तरी पथकाचा कारभार कागदावरच राहिला आहे.

रस्त्यावर होणारे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे नागरिकांचे निरीक्षण आहे. आज फुलेवाडी रिंग रोड परिसरातील नागरिकांनी कामाचा दर्जा पाहून ते बंद पाडले. रस्ते काम होत असताना तेथे लावण्यात आलेले बॅरेकटेड लाथा मारून पाडले. डांबराशिवाय होणारे रस्ते कसे होत आहेत हे संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना दाखवून देत तीव्र नाराजी व्यक्त केली. असाच प्रकार आपटे नगर, क्रांतिसिंह नाना पाटील नगर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी केला. त्यांचा रुद्रावतार पाहून अधिकाऱ्यांनी तेथून हळूच पोबारा केला.