अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी, पानसरे हत्याप्रकरणी अटक केलेल्या समीर गायकवाड याची सीबीआयच्या पथकाने बुधवारी चौकशी केली होती. या चौकशीतून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती आले असून दाभोलकर हत्याप्रकरणाच्या तपासाला गती येण्याची शक्यता आहे. समीर गायकवाड याच्याकडून मिळालेल्या माहितीची खातरजमा करून सीबीआयचे पथक पुन्हा समीरची चौकशी करणार आहे.
अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर, ज्येष्ठ कामगार नेते गोिवदराव पानसरे, ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येमधील साम्य पाहता या हत्येमागे एकच मास्टरमाइंड असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी व्यक्त केला होता. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातनचा साधक समीर विष्णू गायकवाड याला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती. समीर गायकवाड याच्याकडे एन.आय.ए, सीबीआय, सीआयडी, तसेच कर्नाटक सीआयडीने तपास केला होता.
दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्या ७.६५ एम.एम. पिस्तुलातून झाल्या असल्याचा अहवाल बेंगलोर सीआयडीने दिला होता. यानुसार दाभोलकर हत्येचा तपास करणाऱ्या सीबीआय पथकाने १६ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर पोलिसांकडून पानसरे हत्येमधील पाच पुंगळ्या व एक बुलेट ताब्यात घेतली होती. या पथकाने न्यायालयाच्या परवानगीने समीरकडे कसून चौकशी केली होती. यातून मिळालेली माहिती अधिकाऱ्याने गोपनीय ठेवली आहे. समीरने दिलेल्या माहितीची खातरजमा पोलीस करत असून यानंतर दाभोलकर हत्या प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. समीरने दिलेल्या माहितीची फेरतपासणी झाल्यानंतर पुन्हा हे पथक समीरची चौकशी करणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Apr 2016 रोजी प्रकाशित
समीर गायकवाडच्या चौकशीतून दाभोलकरांच्या हत्येबाबत धागेदोरे
नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण
Written by लोकसत्ता टीम

First published on: 16-04-2016 at 03:15 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clue of dabholkar murder case from sameer gaikwad inquiry