कोल्हापूर : कोटयवधी हिंदूंचे राम मंदिराचे स्वप्न, काश्मीरमधील ३७० कलम हटवणे यांसारखे निर्णय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिले असते, तर त्यांनी मोदींचे मुक्तकंठाने अभिनंदन केले असते. पण आज जे त्यांचा कौटुंबिक वारसा सांगत आहेत त्यांनी विचार बदलला आहे. यामुळे ते याबद्दल एक शब्दही उच्चारत नाहीत. बाळासाहेबांचा वारसा, हिंदूत्व हे सांगण्याचा नैतिक अधिकारच तुम्हाला नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. तसेच देशाच्या आणि त्यासोबतच महाराष्ट्राच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्रात तिसऱ्यांदा सत्तेत आणण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागण्याचे आवाहन केले.

हेही वाचा >>> मुख्यमंत्र्यांचे कोल्हापुरातील वेळापत्रक अंमळ उशिरा; कार्यक्रम वेळेत सुरू न झाल्याने नागरिक त्रस्त

कोल्हापूर येथे कालपासून शिवसेनेचे (शिंदे गट) दोन दिवसीय राज्यव्यापी अधिवेशन सुरू होते. आज या अधिवेशनाची सांगता झाली. आज दिवसभर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षाच्या विविध नेत्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. यामध्ये सर्वच नेत्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विजयासह देशात मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागण्याचे आवाहन केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अधिवेशनात काल मंजूर केलेल्या ठरावांमध्ये भाजपच्या गौरवाचे ठराव प्रामुख्याने होते. त्यापाठोपाठच आज अखेरच्या दिवशीही भाषणांमध्ये केंद्रात भाजपच्या गौरवाचाच प्रभाव दिसून आला.शिंदे म्हणाले, की आपण अधिवेशनात शेतकऱ्यांचे, गरजूंचे ठराव घेतले. बाळासाहेब ठाकरे आणि कोटयवधी हिंदूंचे राम मंदिराचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केले आहे. आपण त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्तावही सादर केला. देशाच्या आणि पर्यायाने महाराष्ट्राच्याही विकासासाठी नरेंद्र मोदी यांना पुन्हा केंद्रात सत्ता सोपवणे आवश्यक असल्याचे सांगत शिंदे म्हणाले, की लोकसभा निवडणुकीमध्ये ४०० हून अधिक जागा आणि महाराष्ट्रातून किमान ४५ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट आपण ठेवलेले आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली हे शक्य असून, त्यासाठी आपला पक्ष आणि प्रत्येक शिवसैनिकालाही आपले योगदान द्यावे लागणार आहे.