संसद आणि राज्य विधिमंडळ येथे जनतेच्या जिव्हाळ्याचे, मतदारसंघाच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याची नामी संधी असताना कोल्हापुरातील खासदार धनंजय महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांना सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अधिक महत्त्वाची वाटू लागली आहे. त्यासाठी त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे पाठ फिरवून कारखाना निवडणूक आखाड्यात उडी घेतली आहे. दोघांचेही राजकीय कार्यक्षेत्र कोल्हापूर जिल्हा असताना त्यांनी सोलापूर जिल्हातील साखर कारखाना निवडणूक जवळ केली आहे. कोल्हापुरातील राजकीय – सहकार क्षेत्रात महाडिक – पाटील कुटुंबाचा संघर्ष गेली तपभर गाजत असताना आता त्याला सोलापूरचा राजकीय तडका पाहायला मिळतो आहे.
कोल्हापुरात राजकीय संघर्षाचे अनेक नमुने पहायला मिळतात.महाडिक – पाटील कुटुंबात मात्र मैत्री,  दुश्मनी, पुन्हा दोस्ताना आणि फिरून वैर असा संघर्षांच्या काटा नेहमीच झुलत राहिला आहे. माजी विधान परिषद महादेवराव महाडिक यांच्या समवेत सतेज पाटील यांनी राजकीय श्रीगणेशा केला. त्यांची मदत झाल्याने पाटील हे विधान सभेत पोहचले .मात्र , दोघात दुरावा आला. परिणामी पुढील विधानसभा निवडणुकीवेळी पाटील यांच्या समोर महाडिक यांचे पुतणे धनंजय महाडिक उभे ठाकले. चुरशीच्या लढतील पाटील यांनी बाजी मारली. गृह राज्य मंत्री झाल्याने पाटील यांचे राजकीय महत्त्व वाढले.
मागील लोकसभा निवडणुकीवेळी मतभेद विसरून सतेज यांनी जुने मित्र  धनंजय यांना मदत करून निवडून आणले. पण ,महाडिक – पाटील कुटुंबात  दोस्ताना अल्प काळ टिकला . गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी महादेवराव महाडिक यांनी आपले सुपुत्र अमल यास भाजपच्या  तिकिटावर उभे करून पाटील यांच्या विरुद्ध निवडून आणले .  महाडिकांचा आनंद पाटील यांनी फार काळ टिकू दिला नाही . कोल्हापूर महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसचा झेंडा फडकवल्यानंतर पाटील यांनी विधान परिषद निवडणुकीत लक्ष घातले.  महादेवराव महाडिक यांची  १८ वर्षांची मक्तेदारी मोडून काढत पाटील यांनी गुरूलाच आस्मान दाखवले.
यानंतर गेली दोन महिने महाडिक-पाटील कुटुंबात टोकाचा वाद दिसला नाही. पण, कोल्हापुरातील नव्हे तर सोलापूर जिल्हातील साखर कारखाना निवडणूक महाडिक-पाटील कुटुंबात वादास कारणीभूत ठरली आहे. पंढरपूर तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्यावर धनंजय महाडिक यांचे वर्चस्व आहे. ते टिकवून ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्या मार्गात पाटील यांनी काटे पेरण्याचे काम चालवले आहे.पंढरपूरचे युवा नेते प्रशांत परिचारक यांनी महाडिक यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. त्यासाठी त्यांनी सतेज पाटील यांना प्रचार करण्यासाठी बोलावले आहे. पाटील यांचे  विधान परिषद  निवडणूक जिंकल्यानंतर सध्या सुरु असलेले पहिलेच आणि त्यातही अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. तर महाडिक यांनीही या अर्थसंकल्पीय अधिवेशनमध्ये कोल्हापूरचे अनेक प्रश्न धसास लावणार असल्याचे म्हटले होते. तथापि साखर कारखान्याच्या निवडणुकीची गोडी इतकी मधुर की दोन्ही लोकप्रतिनिधींनी अधिवेशनाकडे पाठ फिरवून कारखाना निवडणूक आखाड्यात उडी घेतली आहे . मतदार संघ, मतदार यांची बांधीलकी पंढरीच्या चंद्रभागेत वाहत जात आहे.