संजय गांधी निराधारसह अन्य योजनांचे अनुदान मिळण्यात होत असलेला विलंब आणि या योजनांचे तीनतेरा वाजवण्याचा प्रयत्न, या विरोधात मंगळवारी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी शासनाच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.
संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना आदी योजनांची अंमलबजावणी तात्काळ सुरू करावी, या मागणीसाठी आज माजी मंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची सुरुवात बालाजी गार्डन येथून झाली. विविध योजनांमधील लाभार्थी व कार्यकर्त्यांसह सुमारे तीन हजारहून अधिक नागरिकांनी मोर्चात सहभाग घेतला होता. भाजप सरकार विरोधात दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.
काँग्रेसने सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजना सुरू केल्या. मात्र भाजप सरकारने त्या बंद पाडण्याचा डाव सुरू केला. या योजना बंद करून सरकार एक प्रकारे सामान्यांच्या तोंडचा घासच काढून घेत आहे, असा आरोप सतेज पाटील यांनी या वेळी झालेल्या सभेत केला.
पालकमंत्र्यांवर निशाणा
पालकमंत्री गोरगरिबांचा असतो, मात्र तोच पालकमंत्री या गोरगरिबांच्या तोंडचा घास हिसकावून घेत आहे. खोटं बोल पण रेटून बोल, अशी नीती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची असल्याबद्दल सतेज पाटील यांनी टीका केली. संजय गांधी निराधार योजनेच्या पंधरा कमिटींपकी केवळ पाच कमिटीच अस्तित्वात आहेत. उर्वरित कमिटींची स्थापना तत्काळ करावी. या कमिटी स्थापण्यासाठी शिवसेना व भाजपमध्ये वाद सुरू आहे, तो वाद मिटवून कमिटय़ांची स्थापना करावी, अशी मागणी पाटील यांनी केली.