कोल्हापूरकर मंत्र्यांपासून ते नागपूरकर मंत्र्यांपर्यंत महापालिका निवडणुकीचे वास्तवाचे गणित चुकल्याने अखेर करवीरनगरीच्या महापौरपदाला गवसणी घालण्याचे भाजपचे गणित चुकलेच. उलट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आखाडय़ात मुरलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीने नेटकी बांधणी करत गेलेली पद उंचावतानाच महापालिकेवरील आपले वर्चस्व कायम राखले. स्थानिक पातळीवरचे राजकारण करताना परिस्थिती काबूत नसतानाही अवास्तव विधान करण्यातून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या राजकीय परिपक्वतेचा अभाव दिसून आला. त्यांच्या सालस स्वभावाचा फायदा उठवत हाती नसलेली गणिते मांडण्यास टुकारांनी भाग पाडले अन् दादाही त्याला फशी पडले. प्रबळ विरोधक म्हणून कामगिरी बजावताना पालकमंत्र्यांनी स्वत:हून परिस्थितीचा अदमास घेऊन पावले टाकण्याची गरज प्रकर्षांने भासत आहे.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीचे कुरुक्षेत्र भलतेच गाजले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभारावर टीकेची झोड उडवताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका ताब्यात घेण्याचा मनसुबा व्यक्त केला. स्थानिक पातळीवर ताराराणी आघाडीची ताकद असली तरी ती बदनाम असल्याची भान ठेवले गेले नाही. नि:संगाशी संग केल्याची किंमत निवडणुकीत चुकवावी लागली. भाजप-ताराराणी आघाडीने ५० जागांचा दावा केला तरी ३२ जागांवर समाधान मानावे लागले. तर महापालिकेतील जागांची पत खालावूनही काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी दोन अपक्षांसह ४४ जागा मिळविल्या.
अशा स्थितीत महापालिका ताब्यात घेणे कितपत शक्य आहे याचा विचार करून पालकमंत्र्यांकडून विधाने होणे अपेक्षित होते. शिकार मग ती खरोखरीची असो की राजकारणाची, सावज टप्प्यात आल्याशिवाय ती साधायची नसते, याचा विसर पडला आणि पालकमंत्र्यांनी महापालिकेत चमत्कार होईल, अशी घोषणा करून एकच खळबळ उडवून दिली. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी सहकार्य करण्याचा शब्द दिल्याचे पालकमंत्र्यांचे म्हणणे होते, मात्र ज्यांनी शब्द दिला होता तो कितपत विश्वासार्ह होता, याचा विचारही करणे गरजेचे होते. खेरीज, राजकीय खलबते पडद्याआडची असल्याने माध्यमांद्वारे उघडपणे सत्ता स्थापनेचा दावा करणे अंगलट येण्यासारखे होते. महापौर निवडीच्या अंतिम प्रक्रियेतून हीच बाब स्पष्ट झाली. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने ऐनवेळी गुंगारा दिल्याने आणि मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेही सहकार्याचा हात झिडकारल्याने महापालिकेत कमळ फुलवण्याचे सहकारमंत्र्यांचे स्वप्न भंगले.
उमेदवारी निवडीपासून ते प्रचार सभांतील मुद्यांपर्यंतची भाजपची समीकरणेही चुकली. कल्याण-डोंबिवली महापालिकेसाठी साडेसहा हजार कोटीचा विकासनिधी देण्याची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरसाठी एक रुपयाच्या विकासनिधीचीही घोषणा न केल्याने त्याची मतदारात नकारात्मक प्रतिक्रिया उमटली. उलट काँग्रेस-राष्ट्रवादीने केलेल्या विकासकामांमध्ये गरव्यवहार, दोष असतानाही त्याचे सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांनी योग्य मार्केटिंग करत मतांची बेगमी करत अखेर सत्तासोपान गाठले.