वायदे बाजाराच्या माध्यमातून शेतीमालाचे दर पाडून शेतक-यांची लूट सुरू आहे. त्वरित वायदे बाजारातून शेतीमाल हटवावा, अशी आग्रही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे सोमवारी केली.
नवी दिल्ली येथे अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली व अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा व अर्थ खात्यातील वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत सोमवारी कृषी क्षेत्राशी संबंधित वेगवेगळ्या सरकारी संस्था, वित्तीय संस्था, कृषी संशोधन संस्था, रासायनिक खते , बी बियाणे, औषधे उत्पादक, कार्पोरेट कंपन्यांचे प्रतिनिधी त्याचबरोबर अन्न प्रक्रिया क्षेत्रातील कंपन्या, ज्येष्ठ पत्रकार, शेतकरी नेते यांच्या समवेत आगामी अर्थसंकल्पातील कृषी क्षेत्राशी निगडित धोरणात्मक बाबींविषयी प्रदीर्घ चर्चा झाली. चच्रेदरम्यान शेट्टी यांनी देशातील शेतक-याचे प्रतिनिधित्व केले.
या वेळी शेट्टी म्हणाले की,  देशातील अन्न धान्याच्या किमतीमध्ये होणारी अवाजवी चढ-उतार व त्यामुळे शेतक-यांची व्यापारी व सट्टेबाजांकडून होणारी लूट व शोषणामुळे शेतक-यांचे नुकसान होत आहे. विशेषत: साखर, डाळ, कांदा यांच्या किमतीमध्ये होणारे अवास्तव चढउतार, वायदे बाजाराच्या माध्यमातून सट्टेबाजांनी शेतकरी ग्राहक यांची लूट सुरू केली आहे. यामुळे शेतक-यांमध्ये सरकारच्याप्रति तीव्र असंतोष पसरलेला आहे.
शेती मालाच्या आयात-निर्यातसंबंधी केंद्र सरकारचे धोरण स्थिर असावे हे सांगताना त्यांनी कांद्याचे उदाहरण दिले. गारपीट व दुष्काळामुळे शेतीमालाचे उत्पादन घटले. परिणामी दर अल्पकाळ ४०/५० रुपये प्रतिकिलो झाले. केंद्र सरकारने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी कांद्याचे निर्यातमूल्य आधी ४०० डॉलर व त्यानंतर ७०० डॉलर केले. दरम्यान नवा कांदा बाजारात आला व याचा परिणाम कांद्याचे दर कोसळले. पडेल किमतीने व्यापारी व साठेबाजाने कांदा खरेदी करून ठेवला. दुसरीकडे सरकारने निर्यातमूल्य शून्य केल्यामुळे कांद्याचे दर वाढले. मात्र तोपर्यंत शेतक-यांनी कांदा विकलेला होता, त्यामुळे पुन्हा फायदा व्यापा-यांचा झाला. असे प्रकार टाळण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठित करणे गरजेचे आहे अशी त्यांनी मागणी केली.